
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ प्रोपलेन गॅस टँकर उलटून 30 तासांच्या महाभीषण वाहतूककोंडीला दोन आठवडे उलटत नाही तोच आज पुन्हा बोरघाटात प्रोपलेन गॅस टँकरने दहशत माजवली. 21 टन प्रोपलेन गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचे सकाळी ब्रेक फेल झाले आणि नियंत्रण सुटलेला टँकर थेट कठड्यावर धडकला. प्रसंगावधान राखून पोलीस व आपत्कालीन यंत्रणेने टँकर सुरक्षित ठिकाणी हलवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र या घटनेमुळे अर्धा तास वाहतूककोंडी झाली.
ज्वलनशील प्रोपलेन गॅसने भरलेला टँकर कोचीहून गुजरातच्या दिशेने जात होता. बोरघाटातील अमृतांजन ब्रीजजवळ आला असता ब्रेक निकामे झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने अक्षरशः ब्रेकवर उभे राहून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही. अखेर चालकाने अत्यंत सतर्कतेने व कौशल्याने टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्यापर्यंत कसाबसा नेला. टँकरने कठड्याला धडक दिली आणि तो जागीच थांबला. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, देवदूत यंत्रणा आणि हेल्प फाऊंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षेच्या दुष्टीने मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती.
सुटकेचा निःश्वास
हेल्थ फाऊंडेशनचे केमिकल एक्सपर्ट धनंजय गीध यांनी टँकरची तांत्रिक स्थिती, दाब, गळती आदीची तपासणी केली. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त टँकर दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सुरक्षितस्थळी हलवण्यात आला. अपघातग्रस्त टँकर रस्त्याच्या बाजूला केल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.






























































