
काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे व त्यांच्या साथीदारांनी मित्रमंडळ चौक परिसरात बेदम मारहाण केल्याची घटना घडली. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानशी केल्याच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले होते. त्यावर एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत पवार आणि दामगुडे यांच्यात खडाजंगी झाली होती.
सोमवारी पुन्हा एका वृत्तवाहिनीवरील चर्चेनंतर स्टुडिओबाहेर हा वाद धुमसला. कार्यालयाबाहेर थांबलेल्या दामगुडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पवार यांना शिवीगाळ करत जाब विचारला. ‘तू भाजप आणि संघाला विरोध का करतोस? सपकाळांची बाजू का घेतोस?’ असा सवाल करत त्यांना मारहाण करण्यात आल्याचा पवार यांचा आरोप आहे. आपल्याला पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला.
दुसरीकडे दामगुडे यांनीही प्रत्यारोप केले आहेत. पूर्वीच्या चर्चेत पवार यांनी मला शिवीगाळ केली होती. आजही त्यांनी नक्षलवाद्यांचा उल्लेख करत धमकी दिली. या धमकी मागील हेतूची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
































































