
निसर्गाचे रौद्ररूप काय असते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात आला आहे. कुल्लू-मणिकरण मार्गावर अचानक झालेल्या भीषण भूस्खलनाचा (Landslide) एक थरारक व्हिडीओ समोर आला असून, तो पाहून कोणाच्याही अंगावर शहारे येतील. डोंगराचा एक प्रचंड मोठा भाग पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळताना या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुल्लू जिल्ह्यातील जरी जवळ ही घटना घडली. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सुरुवातीला डोंगरावरून काही लहान दगड खाली येतात, मात्र काही क्षणांतच संपूर्ण डोंगर कडाडत मुख्य रस्त्यावर कोसळतो. सुदैवाने, दरड कोसळण्याचा अंदाज आल्याने रस्त्यावरील वाहनचालकांनी आपली वाहने आधीच थांबवली होती, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या भूस्खलनामुळे मणिकरण खोऱ्याचा जिल्हा मुख्यालयाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. येथे मोठ्या संख्येने पर्यटक आणि स्थानिक नागरिक अडकले असून, जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणाऱ्या वाहनांच्याही लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी आणि जेसीबी मशिनच्या साहाय्याने रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे. मात्र परिसरात अद्यापही दगड पडण्याचे सत्र सुरू असल्याने बचाव कार्यात मोठे अडथळे येत आहेत.
This looks straight out of some fictional movie. Summers have just begun and the landslide season has already started. Video from Manikaran, Kullu Himachal Pradesh.
Dear travellers, the mountains are beautiful but unpredictable. Travel safe ! pic.twitter.com/svuX9eEzdj— Nikhil saini (@iNikhilsaini) February 24, 2026



























































