
>> पराग खोत
मराठी कवितेच्या सादरीकरणाला अलीकडच्या काळात नवसंजीवनी मिळताना दिसते आहे. पूर्वसुरींनी घालून दिलेल्या पायघड्यांवरून पुढे जात नवी पिढी मोठय़ा दिमाखात ती परंपरा जोपासतेय. पारंपरिक काव्यवाचनाच्या चौकटीबाहेर जाऊन कविता, संगीत आणि संवाद यांची सांगड घालणारे कार्यक्रम रसिकांच्या पसंतीस उतरत आहेत. अशाच लोकप्रिय होत असलेल्या काव्यसंगीत मैफलींपैकी ‘अक्षर अक्षर तुझेच आहे’ हा कार्यक्रम सध्या विशेष लक्ष वेधून घेतोय.
कवन निर्मित ‘अक्षर अक्षर तुझेच आहे’ ही स्वरचित मराठी कवितांची सांगीतिक मैफल केवळ काव्यवाचनापुरती मर्यादित राहत नाही; तर ती एक भावनिक अनुभव यात्रा ठरते. शब्द, स्वर, संगीत आणि सादरीकरण यांचा संतुलित मेळ या कार्यक्रमाचं वैशिष्टय़ आहे. त्यामुळे कविता ऐकण्याचा अनुभव अधिक जिवंत आणि स्मरणीय होतो. या मैफलीत कवी अपूर्व राजपूत, अविनाश काठवटे, सारंग पांपटवार आणि नैनेश तांबे आपल्या स्वरचित कविता, गाणी आणि गझलांचं मुक्त सादरीकरण करतात. प्रत्येक कवीची अभिव्यक्ती वेगळी असल्यामुळे कार्यक्रमात विषयांची आणि भावविश्वाची समृद्ध विविधता अनुभवायला मिळते. प्रेम, नातेसंबंध, शहरातलं जगणं, आठवणी, एकटेपण आणि आशावाद अशा अनेक छटा या सादरीकरणातून उलगडताना दिसतात आणि त्या तरुणाईला भुरळ घालतात. त्यांना तितकीच समर्थ सांगीतिक साथ देतो तो राग. रागच्या अद्भुत वादनकौशल्यामुळे या सादरीकरणाला एक अनोखी लय प्राप्त झाली आहे, जी प्रत्येक कवितेला भावनिक उंची देते. की-बोर्ड, गिटार, कॅजोन बॉक्स आणि इतरही काही वाद्ये तो लीलया वाजवतो आणि एक बहारदार मैफल सादर होते.
या कार्यक्रमाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे मराठी कवितेला धरून केलेले सृजनशील प्रयोग. पारंपरिक काव्यवाचनासोबत संगीताची जोड, संवादात्मक सादरीकरण, श्रोत्यांचा सहभाग आणि कधी कधी एकत्र गायन अशा प्रयोगांमुळे कार्यक्रम अधिक जवळचा वाटतो. त्यामुळे कविता ही केवळ ऐकण्याची गोष्ट न राहता अनुभवण्याची प्रक्रिया बनते. फक्त एका वर्षात, ‘अक्षर अक्षर तुझे आहे’ हा कार्यक्रम महाराष्ट्रभर एक आवडता कार्यक्रम ठरला आहे, ज्याने सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित केलंय आणि थेट कवितांना एका सामायिक, तल्लीन करणाऱया उत्सवात रूपांतरित केले आहे. हाऊसफुल्ल गर्दीत तरुणाई देत असलेली दाद आणि ते सभागृहात करत असलेला जल्लोष याचा प्रत्यय देतो.
मराठी भाषेशी असलेली नाळ अधिक घट्ट करण्याचं कामही ‘अक्षर अक्षर तुझेच आहे’ ही मैफल करताना दिसते. नव्या पिढीला कविता ऐकण्याची ओढ निर्माण करणं आणि जुन्या रसिकांना नव्या अभिव्यक्तीची ओळख करून देणं या दोन्ही स्तरांवर हा उपक्रम महत्त्वाचा ठरतो. मराठी गझलकार भाऊसाहेब पाटणकर आणि भीमराव पांचाळे यांचा प्रभाव ह्या मैफिलीत जाणवतो. मात्र प्रमाण मराठी भाषेचा काही वेळा सुटणारा हात, घट्ट धरून ठेवायचा का? याचा निर्णय कलाकारांनी वेळीच घ्यायला हवा. तसेच प्रेक्षकांनी स्वतःवर झालेले कवितांचे संस्कार आणि नवकवितेविषयीचे पूर्वग्रह बाजूला ठेवूनच ह्या मैफिलीला सामोरे जायला हवे. तसंच काही कवितांतून यमकाचा सोस जाणवतो तिथे दुर्लक्ष करता यायला हवे.
आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या मनात साचलेल्या भावनांना शब्द मिळत नाहीत. अशा वेळी ही मैफल त्या भावनांना नेमकी अभिव्यक्ती देते. कधी हलकंसं हसू आणते, कधी नकळत डोळे ओलावते, तर कधी एखादी ओळ मनात दीर्घकाळ रेंगाळत राहते. म्हणूनच हा कार्यक्रम केवळ मनोरंजन न ठरता भावनिक संवादाचं माध्यम ठरतो. विशेष म्हणजे या मैफलीत प्रेक्षक आणि कलाकार यांच्यातील अंतर कमी होताना दिसतं. मंचावरचं सादरीकरण आणि आसनावर बसलेला रसिक यांच्यात एक सामायिक भावविश्व तयार होतं. एकत्र कविता ऐकणं, ओळी गुणगुणणं आणि त्या क्षणाचा सामूहिक आनंद घेणं ही या कार्यक्रमाची खरी ताकद आहे.
एकूणच, शब्द, स्वर आणि संवेदना यांची सुंदर गुंफण असलेला ‘अक्षर अक्षर तुझेच आहे’ हा कार्यक्रम मराठी काव्यप्रेमींसाठी एक समृद्ध अनुभव आहे. कविता मनापासून ऐकण्याची, स्वतःला शोधण्याची आणि मातृभाषेशी पुन्हा जोडून घेण्याची इच्छा असणाऱयांसाठी ही मैफल नक्कीच अनुभवण्यासारखी आहे.
- लेखन आणि सादरीकरण – कवी अपूर्व राजपूत, अविनाश काठवटे, सारंग पांपटवार आणि नैनेश तांबे.
- संगीत साथ – राग
- निर्माता – कवन
- सूत्रधार – आदित्य जाधव


























































