
अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने दणका दिल्यानंतरही टॅरिफच्या मुद्दय़ावर डोनाल्ड ट्रम्प हे माघार घ्यायला तयार नाहीत. विशेषतः हिंदुस्थानच्या बाबतीत त्यांनी अधिकच कठोर भूमिका घेतली असून आता हिंदुस्थानला मोठा झटका दिला आहे. हिंद्स्थानातून अमेरिकेत आयात होणाऱया सोलर पॅनेलवर तब्बल 126 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय ट्रम्प सरकारने घेतला आहे.
अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. हिंदुस्थान सरकार स्थानिक उत्पादकांना अनावश्यक सबसिडी देत आहे. त्यामुळे अमेरिकी उत्पादनांना फटका बसत आहे. अमेरिकी उत्पादकांचे हे नुकसान कमी करण्यासाठी आम्ही सोलर पॅनेल व सेल्सच्या आयातीवर निर्बंध लादत आहोत, असे अमेरिका सरकारने स्पष्ट केले आहे. हिंदुस्थानबरोबरच अमेरिकेने इंडोनेशियावर 83 ते 143 टक्के आणि लाओसवर 81 टक्के टॅरिफ लावले आहे.
करारावर परिणाम होणार?
हिंदुस्थान-अमेरिकेतील संभाव्य व्यापार कराराच्या मसुद्यावर एकमत झाल्यानंतर काही दिवसांतच अमेरिकेने हा निर्णय घेतल्याने हिंदुस्थानची चिंता वाढली आहे. अमेरिकेशी झालेल्या करारात हिंदुस्थानला 18 टक्के टॅरिफ द्यावे लागणार होते, मात्र आता ट्रम्प सरकारने सोलर पॅनेलवर 126 टक्के शुल्क लावल्याने करारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हिंदुस्थान-अमेरिकेच्या प्रतिनिधींमध्ये या आठवडय़ात होणारी तीन दिवसीय बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.































































