
एसटी महामंडळाच्या राज्यभरातील 86 हजार कर्मचाऱयांचा वेतनवाढीचा थकीत हप्ता अखेर बुधवारी कर्मचाऱयांच्या बँक खात्यात जमा झाला. थकीत रक्कम मिळवण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार सेना, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना व इतर संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. त्याची दखल घेत सरकारने एसटी कर्मचाऱयांसाठी 100 कोटींची तरतूद केली.
ऑक्टोबर 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहमतीने कामगार संघटनांच्या बैठकीत दरमहा 65 कोटी रुपयांचे अनुदान देण्याचे घोषित केले. त्यानुसार डिसेंबरपासून प्रक्रिया सुरू झाली. मात्र फेब्रुवारीत पुरेसा निधी न मिळाल्यामुळे वेतनवाढीचा हप्ता देण्यात आला नाही. यामुळे कामगार संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर महामंडळ प्रशासनाने सरकारकडे अतिरिक्त निधीसाठी पत्रव्यवहार केला. अंतिमत- ती कार्यवाही पूर्ण होऊन वेतनवाढीच्या हप्त्याची रक्कम कर्मचाऱयांच्या खात्यात जमा झाली.


























































