
राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष, भाजपचे नेते शेखर चरेगांवकर यांना फलटण येथील यशवंत सहकारी बँक येथील तब्बल 112 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कराड न्यायालयात हजर केल्यानंतर पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी शेखर चरेगांवकर यांना 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
सातारा जिह्यातील फलटण येथील यशवंत सहकारी बँकेत सुमारे 112 कोटी 10 लाख 57 हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका शेखर चरेगांवकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटे त्यांच्या निवासस्थानातून त्यांना अटक केली. या प्रकरणात शेखर चरेगांवकर यांच्यासह बँकेचे संचालक, अधिकारी व नातेवाईक अशा एकूण सुमारे 50 जणांविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान 2014 ते 2025 या कालावधीत सुमारे 195 बोगस कर्जखाती उघडून, कोणतेही तारण न घेता तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे कोटय़वधी रुपयांचा अपहार झाल्याचे प्राथमिक निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
दरम्यान, डिसेंबर 2025 मध्ये अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांनी या घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या शाखांसह शेखर चरेगांवकर यांच्या नातेवाईकांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. अटक टाळण्यासाठी शेखर चरेगांवकर यांनी न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता; मात्र गुह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने तो फेटाळला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पुष्पा जितेंद्र जाधव यांनी न्यायालयात या प्रकरणाची पार्श्वभूमी मांडत शेखर चरेगांवकर यांच्या भूमिकेचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने ती मान्य करत त्यांना 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.


























































