
उपांत्य फेरीचा किंवा अंतिम फेरीचा सामना दुसरीकडे हलवला तर तिकीटधारकांचे एकही रुपयाचे नुकसान होणार नाही, अशा द्विधा मनःस्थितीत असलेल्या तिकीटधारकांना आयसीसीने दिलासा दिलाय. टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीभोवती निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर हा मोठा दिलासा मानला जातो आहे. हजारो चाहत्यांनी आधीच तिकीटं आरक्षित केली आहेत; त्यामुळे ठिकाण बदलल्यास काय होणार, हा प्रश्न भेडसावत होता. आता मात्र चित्र स्पष्ट झालं आहे-ठिकाण बदललं, तर पूर्ण पैसे परत. तसेच आजपासून आयसीसीने उपांत्य आणि अंतिम फेरीची तिकीट विक्री सुरू केली आहे.
स्पर्धेचं आयोजन हिंदुस्थान आणि श्रीलंका या दोन देशांत होत असल्याने काही सामने परिस्थितीनुसार हलवण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचल्यास सुरक्षा आणि राजकीय कारणांमुळे त्याचा सामना हिंदुस्थानात न खेळवता कोलंबोत खेळविला जाणार आहे.


























































