
केंद्र सरकारच्या बफर झोनच्या आक्षेपामुळे प्रस्तावित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा प्रकल्प रखडला आहे. आता हा मार्ग बदलावा लागणार आहे. या नव्या मार्गासाठी केंद्र सरकारशी चर्चा करून तज्ञांची समिती नेमली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. अभ्यास गटाच्या समितीकडून अहवाल मागवून पर्यायी मार्गाबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलल्या प्रकरणी तारांकित प्रश्न आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत मांडला होता. पूर्वी ‘महारेल’मार्फत प्रस्ताव तयार केला होता. आता सेंट्रल रेल्वेकडे गेल्यानंतर जीएमआरटीच्या कारणास्तव मार्ग बदलावा लागला, असे सांगितले; परंतु ‘जीएमआरटी’ने अशा प्रकारचा कोणताही तांत्रिक आक्षेप नोंदवलेला नाही, अशी बाब तांबे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.





























































