उत्तर प्रदेशपेक्षा नाशिकच्या कुंभमेळ्याचे बजेट पाच हजार कोटींनी अधिक, जयंत पाटील यांचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करून 25 हजार कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या कुंभमेळ्यापेक्षा नाशिकच्या कुंभमेळ्याचे बजेट अधिक आहे. मागील कुंभमेळ्यात सीसीटीव्हींसाठी दहा कोटी रुपये खर्च झाले होते. आता हेच काम तीनशे कोटी रुपयांवर गेले आहे. त्यामुळे यामध्ये भ्रष्टाचार होतोय अशी लोकांना शंका येते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना जयंत पाटील यांनी टीकास्त्र सोडले. कुंभमेळ्यासाठी आर्थिक तरतुदीबद्दल आश्चर्य व्यक्त करताना जयंत पाटील म्हणाले की, कुंभमेळ्यातील कंत्राट गुजरात किंवा परराज्यातील कंत्राटदारांना जाऊ नयेत. महाराष्ट्रातील कंत्राटदारांना कामे मिळावीत. एकीकडे कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत, निवडणुकीतील आश्वासनाप्रमाणे लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यास नाहीत याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.