ग्रामीण रोजगार हमी योजनेतील मजुरांची 170 कोटींची बिले थकली, केंद्राने थकवला राज्याचा निधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bharat-gogawale

राज्यातील, खास करून गडचिरोली, बुलडाणा, ठाणे जिह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुरांची 170 कोटी रुपयांची रक्कम थकली आहे. केंद्राकडून निधी आल्यावर थकीत रक्कम वितरित करण्यात येईल, असे आश्वासन रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी आज विधानसभेत दिले.

रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची थकीत रक्कम देण्याबाबत सदस्य मनोज कायंदे यांनी मूळ प्रश्न विचारला होता. त्यावरील चर्चेत चेतन तुपे, विजय वडेट्टीवार प्रशांत बंब, नितीन राऊत यांनी भाग घेतला. पैसे मिळत नसल्याने मजुरांची संख्या कमी झाली आहे. केंद्राने राज्याला पैसे दिले नाहीत म्हणून कामे होत नाहीत याकडे विजय वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले. त्यावर केंद्राचा निधी आल्यावर पैसे दिले जातील असे मंत्री भरत गोगावले म्हणाले. त्यावर भाजप सदस्यांकडून घरचा अहेर मिळाला.

भाजपचे सदस्य प्रशांत बंब या उत्तरावर संतप्त झाले. हे अधिवेशन संपण्यापूर्वी मजुरांचे पैसे द्या; नाहीतर पैसे देण्यास हतबल आहोत असे सांगून टाकावे, अशा शब्दांत प्रशांत बंब यांनी सरकारला घरचा अहेर दिला. त्यावर या आठवड्यात केंद्राचे पैसे येत आहेत. ते आम्ही देऊ असे उत्तर मंत्र्यांनी दिले.

अध्यक्षांनी केली मंत्र्यांची कानउघडणी

अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्र्याची कानउघडणी केली. असे मोघम उत्तर देऊन चालणार नाही. पैसे उपलब्ध झाल्यावर देऊ हे सांगणे योग्य नाही. केंद्राकडून पैसे घेण्याची जबाबदारी राज्याची आहे याची आठवण अध्यक्षांनी करून दिली. अखेर निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल. कधी निधी उपलब्ध होईल याची माहिती अधिवेशन संपण्यापूर्वी दिली जाईल असे आश्वासन मंत्री गोगावले यांनी सभागृहाला दिले.