जाऊ शब्दांच्या गावा – दिस येतील…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> साधना गोरे

आज मराठी भाषा दिन, सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या निमित्ताने आज आपण ‘दिन’, ‘दिवस’ या शब्दाची माहिती घेणार आहोत.

दिन, दिवस हे दोन्ही शब्द संस्कृतमधील ‘दिव्’ धातूपासून (मूळ शब्दापासून) आल्याचे शब्दकोशकार सांगतात. हा ‘दिव्’ शब्द आणि भारोपीय म्हणजे भारतीय-युरोपीय भाषा कुळातील Dyeu या धातूमध्ये विलक्षण साम्य आहे. या ‘दिव्’ शब्दात चमक, उज्ज्वलता, प्रकाश असे भाव आहेत. संस्कृत, प्राकृत व पाली या भाषांमध्ये ‘दिवस’ शब्द आहे. त्यापासूनच उत्तरेकडील बऱ्याच भाषांमध्ये त्याच्याशी मिळतीजुळती रूपं आहेत. यासंदर्भात कृ. पां. कुलकर्णी म्हणतात, ‘हा दिवस शब्द संस्कृत दह्, भारोपीय Dhegh या धातूशी संबंधित आहे. नि+दाघ = उन्हाळा, हा शब्द ond’पासूनच आला आहे. भारोपीय भाषा कुळातील टय़ुटॉनिक म्हणजे जर्मन शाखेतील degoz, गॉथिकमधील Dagsi, लिथुएनियनमधील degas, इंग्रजीत Day हे शब्द परस्परांशी संबंधित आहेत.’ याचा अर्थ बऱ्याच भाषांमधील ‘दिवस’ या अर्थाचे शब्द दाह, उष्णता, प्रकाश या अर्थाचे आहेत आणि त्याचा थेट संबंध सूर्याशी आहे. सूर्यासाठी वापरला जाणारा ‘दिनकर’ हा शब्दही यातूनच निघाला आहे.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बऱ्याचदा ‘दिस’ किंवा ‘दिवस’ हा शब्द थेट सूर्याला उद्देशून वापरला जातो. उदा. दिवस कासराभर वर आला, दिवस झाडावर आला, दिस डोईवर आला, दिस दारात/अंगणात आला इ. ‘दिवस’ शब्दाचे संदर्भाने वेगवेगळे अर्थ होतात. चोवीस तासांच्या कालावधीला दिवस म्हटलं जातं. सूर्योदय ते सूर्यास्त या काळालाही दिवस म्हणतात. ‘दिवसाउजेडी’ म्हणजे दिवस मावळण्यापूर्वीचा, काळोख पडण्यापूर्वीचा काळ. या काळासाठी ‘दिवसाढवळ्या’ असाही शब्दप्रयोग वापरला जातो. आयुष्यातील एका विशिष्ट काळाचा उल्लेख करण्यासाठीही ‘दिवस’ शब्द वापरला जातो. उदा. आमच्या कॉलेजचे दिवस खूप छान होते. चांगली-वाईट स्थिती सांगतानाही ‘दिवस’ शब्द वापरला जातो. उदा.  सध्या वाईट दिवस चालू आहेत. फार अडचणीचा किंवा दुःखाचा काळ असला की, ‘दिवस काढणं / ढकलणं’ म्हटलं जातं.

‘दिवस’ शब्दावरून मराठीत बरेच वाक्प्रचार व म्हणी आहेत. एखादा दिवस फार कंटाळवाणा किंवा अत्यंत दुःखद गेला तर ‘वर्षाएवढा दिवस होता’ म्हटलं जातं. मृत व्यक्तीचे क्रियाकर्म करण्याला ‘दिवस करणं’ म्हणतात. स्त्राrला गर्भधारणा झाली की, ‘दिवस गेले/जाणे’ म्हटलं जातं, तर गरोदर स्त्राr बाळंत होण्यास किती काळ घेईल याविषयी बोलताना ‘किती दिवस घेईल?’ अशी विचारणा होते. गरोदर स्त्रीला नववा महिना पूर्ण झाला की, ‘दिवस भरले’ म्हटलं जातं. याशिवाय हा वाक्प्रचार सद्दी संपणं, उत्कर्ष काळ संपणं या अर्थानंही वापरला जातो. चांगला काळ जाऊन वाईट काळ आला की, दिवस फिरले असंही म्हणतात.

जगात कुठंही गेलं तरी सूर्य नेहमी वरच उगवतो, यावरून जगात सर्वत्र सारखीच परिस्थिती असते हे सांगण्यासाठी ‘जिथं जावं तिथं डोईवर दिवस’ ही म्हण वापरली जाते. ‘दिवसाची रात्र करणे व रात्रीचा दिवस करणे’ ही आपल्याकडे मोठय़ा प्रमाणात वापरली जाणारी म्हण आहे, पण संदर्भ बदलला की, तिचे अर्थ बदलतात. दिवसरात्र कष्ट करणाऱ्यासाठी ही म्हण चांगल्या अर्थाने वापरली जाते, पण एखादा मनुष्य दिवसा झोपा काढून रात्रभर जागत असेल तर त्याची खिल्ली उडवण्यासाठीसुद्धा ही म्हण वापरली जाते. सबंध दिवस वाया घालवून रात्री काम करणाऱ्या माणसाला उद्देशून ‘दिवसभर घरी अन् दिवा लावून दळण करी’, ‘दिवस गेला उटारेटी मग बोटाने काडवाती रेटी / चांदण्यात कापूस रेटी’ यांसारख्या गमतीशीर म्हणीही आहेत.

‘दिवस’/‘दिस’ या शब्दांवरून असे आणखी कितीतरी शब्दप्रयोग सांगता येतील, पण खरा प्रश्न आहे आपल्या मराठी भाषेच्या अस्तित्वाचा. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळून वर्ष केव्हाच लोटलं, पण आपला त्याबद्दलचा आपला आनंद काही सरेना आणि अभिजात भाषेचा निधी अजून मिळेना. काहींना वाटेल, आजच्या दिवशी हे अभद्र बोलणं कशासाठी? तर नुसता अभिजात भाषेचा दर्जा मिळून, मराठी भाषा दिन साजरा करून मराठीची स्थिती सुधारणार नाही हे कोणत्याही विचारी माणसाला कळेल. त्यासाठी मराठी भाषेचा कणा असणाऱ्या मराठी शाळा टिकवायला हव्यात, त्यांचं माध्यमांतर न करता सर्व दृष्टीने त्यांची गुणवत्ता वाढवायला हवी. मग कुठं आपल्या मराठीला चांगले दिवस येतील.

[email protected]