
कधी इशान खेळत होता तर कधी सूर्याची बॅट तळपत होती. तर कधी मधल्या फळीत हार्दिक पंडय़ा बरसत होता, पण आज हिंदुस्थानवर स्पर्धेबाहेर पडण्याचे संकट ओढावताच फलंदाजीतले धुरंधर प्रथमच एकजुटीने खेळले. या वर्ल्ड कपमध्ये ‘शून्याचा बादशहा’ ठरलेल्या अभिषेकच्या बॅटला षटकाराचे रक्त लागले. संजू सॅमसनने अपयशी सलामीची परंपरा मोडली. इशान आणि सूर्यकुमार यादवनेही मीसुद्धा असल्याचे दाखवून दिले आणि सर्वात शेवटी हार्दिक पंडय़ा आणि तिलक वर्माने विजयासाठी धावांचा डोंगर नव्हे तर एव्हरेस्ट उभारला की तो पाहून प्रतिस्पर्धी गुदमरेल. हिंदुस्थानच्या 257 धावांच्या आव्हानाला झिम्बाब्वेचा संघ आव्हानच देऊ शकला नाही. ब्रायन बेनेटने 97 धावांची एकाकी झुंजार खेळी केली, पण तो संघाच्या विजयासाठी कमी आणि 20 षटके पूर्ण करण्यासाठी अधिक खेळला. आधीच हरलेल्या झिम्बाब्वेने 6 बाद 184 धावा करत 72 धावांनी हार मानली.
त्याआधी नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेने वेगवान गोलंदाजांना अनुकूल वातावरणाचा लाभ घेण्याच्या उद्देशाने हिंदुस्थानला प्रथम फलंदाजीस बोलावले; परंतु हा निर्णय त्यांच्या गळय़ातील फास ठरला. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी 22 चेंडूंमध्ये 48 धावांची तडाखेबंद सलामी देत सुरुवातीलाच आक्रमणाचा झेंडा रोवला. सॅमसन 24 धावांवर बाद झाला तरी अभिषेकचा झंझावात थांबला नाही. गेल्या काही सामन्यांत धावांसाठी आसुसलेला अभिषेक येथे मात्र पूर्ण बहरात दिसला. अवघ्या 30 चेंडूंमध्ये 4 षटकार आणि 4 चौकारांसह 55 धावा ठोकत त्याने स्पर्धेतील पहिले अर्धशतक साकारले. इशान किशननेही 38 धावांची वेगवान खेळी करत प्रतिस्पर्धी गोलंदाजीची तारांबळ उडवली. अवघ्या 9.1 षटकांत शतक पूर्ण झाले आणि त्यानंतर धावांचा वेग वाढतच गेला. 15 षटकांत 172 धावांवर असलेला डाव शेवटच्या पाच षटकांत रौद्ररूप धारण करून बसला.
हार्दिक–तिलकही सुस्साट
आघाडीच्या सर्वच फलंदाजांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजीची पिसे काढली. 15 षटकांत 172 वर असलेल्या संघाला अडीचशेच्या पुढे नेण्याचा पराक्रम करताना दोघांनी 31 चेंडूंत 84 धावा काढल्या. शेवटच्या चार षटकांत 14, 19, 21 आणि 15 धावा काढताना 7 षटकार आणि 3 चौकार खेचले. पंडय़ाने 23 चेंडूंत 50 तर तिलक वर्माने 16 चेंडूंत 44 धावा ठोकल्या. पूर्ण डावात 17 चौकार खेचणाऱया हिंदुस्थानने तितकेच षटकार खेचत अनोखा विक्रम केला. 256 ही धावसंख्या हिंदुस्थानची वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली.































































