
येथील सागा बंदिस्त क्रीडा संकुलात महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंचा अक्षरशः झंझावाती खेळ अनुभवायाला मिळाला. 72 व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपउपांत्य फेरीत धडक मारताना महाराष्ट्राने पुद्दुचेरीचा 69-21 असा दणदणीत पराभव केला. आता पुढची गाठ हिमाचल प्रदेशशी असली तरी त्यांना नमवत उपांत्य फेरी गाठण्याचे एकमेव ध्येय महाराष्ट्राने डोळय़ासमोर ठेवले आहे.
सामन्याच्या पहिल्याच चढाईपासून महाराष्ट्र आक्रमणाच्या मोडमध्ये होता. पूर्वार्धात तब्बल तीन लोण देत 35-09 अशी भक्कम आघाडी घेत प्रतिस्पर्ध्यांचा कणा मोडला. उत्तरार्धातही तोच वेग, तोच जोश राखत आणखी दोन लोण चढवत गुणांचे अर्धशतक पार केले आणि अखेर 48 गुणांच्या प्रचंड फरकाने विजयावर शिक्कामोर्तब केले.
आदित्य शिंदे आणि अस्लम इनामदार यांच्या तुफानी चढाया म्हणजे प्रतिस्पर्ध्यांसाठी धडकी भरवणारा अनुभव ठरला. त्यांना संकेत सावंत, दादासो पुजारी आणि जयेश महाजन यांच्या भक्कम बचावाची साथ लाभली. आक्रमण आणि बचाव यांचा परफेक्ट मेळ साधत महाराष्ट्राने सामन्याचे एकतर्फी चित्र रंगवले.
याआधी साखळीतील अखेरच्या लढतीतही महाराष्ट्राने त्रिपुराचा 33-11 असा सहज पराभव करत गटात अपराजित राहण्याची किमया साधली. आता उपउपांत्य फेरीत हिमाचल प्रदेशसमोर महाराष्ट्राची खरी परीक्षा असेल. मात्र सध्याचा फॉर्म आणि आत्मविश्वास पाहता महाराष्ट्राचा विजयघोष अजून थांबणार नाही, हेच स्पष्ट दिसते.































































