मंत्रालयातील लाचखोरी प्रकरण – चौकशी पूर्ण होईपर्यंत झिरवळांना मंत्रीपदावर ठेवू नका, राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने लाच स्वीकारल्याच्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत झिरवळांना मंत्रीपदावर ठेवू नका, अशी जोरदार मागणी विरोधकांनी आज विधान परिषदेत केली. मात्र सभापती राम शिंदे यांनी ही मागणी फेटाळून लावलयाने विरोधकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध करून सभात्याग केला.

सदस्य सतेज पाटील यांनी नियम 289 अन्वये हे मंत्रालयातील लाच प्रकरण मांडले. त्यांनी मंत्री नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले की, माझ्या दालनातील लिपिक राजेंद्र ढेरंगे यांना 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या घटनेचा-माझा कोणताही संबंध नाही. त्या वेळी मी दिल्ली येथे होतो. ढेरंगे यांना निलंबित करण्यात आले आहे. माझ्या राजकीय जीवनात मी अशा घटनांना कधीही पाठीशी घालणार नाही. माझे सचिव डॉ. रामदास गाडे यांनीही जबाबादार धरून त्यांना माझ्या विभागातून कार्यमुक्त करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे, असे सांगताच विरोधकांनी याला आक्षेप घेतला. झिरवळ यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधकांनी लावून धरत झिरवळांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

महाराष्ट्रात एकच हिरवळ, नरहरी झिरवळनरहरी झिरवळ

अर्थसंकलपीय काळात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या खात्याचे अधिकार अन्य तीन मंत्र्यांकडे दिले आहेत. त्यानुसार झिरवळ यांच्या कार्यालयातील लाच प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचे अधिकार चंद्रकांत पाटील यासारख्या ज्येष्ठ मंत्र्याकडे सोपवावेत, असा टोला या वेळी आमदार सतेज पाटील यांनी लगावला. या वेळी महाराष्ट्रात एकच हिरवळ, नरहरी झिरवळनरहरी झिरवळअशा घोषणा विरोधकांनी दिल्या.