
पश्चिम उपनगरातील पोलीस बांधवांना वैद्यकीय उपचारांसाठी पॅनेलवर अनेक रुग्णालये आहेत. त्यातून सेव्हन हिल्स रुग्णालय वगळण्यात आल्याने पश्चिम उपनगरातील पोलिसांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सेव्हन हिल्स रुग्णालय पुन्हा पॅनेलवर घेण्यात यावे तसेच त्या रुग्णालयात कर्करोग उपचारांची सोय करावी, अशी मागणी शिवसेना आमदार अनंत (बाळा) नर यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान केली.
अनंत नर यांनी जोगेश्वरी पूर्व भागातील अन्न व नागरी पुरवठा तसेच आरोग्यासंदर्भातील समस्या सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्या. जोगेश्वरी पूर्व बिंबिसार नगरमध्ये शिधावाटप कार्यालय उपलब्ध करून द्यावे, शिधावाटप दुकानांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा थम्ब मशीनवर येत नाही त्याबद्दल उपाययोजना करावी, जोगेश्वरीतील सर्वोदय नगर दवाखाना बंद अवस्थेत आहे त्याची दुरुस्ती करावी, महामार्गाच्या बाजूला ख्रिश्चन स्मशानभूमीला जागा देऊनही तिथे स्मशानभूमी उभारली गेलेली नाही ती लवकर उभारण्यात यावी, अशा मागण्याही आमदार नर यांनी केल्या.
जोगेश्वरीच्या ट्रॉमा रुग्णालयातील दोन आयसीयू बंद पडले. ते अद्यापपर्यंत बंदच आहेत. त्या रुग्णालयांत मनुष्यबळही नाही. काही डॉक्टर नुसते हजेरी लावून इतरत्र काम करतात. त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही नर यांनी केली.


























































