
महाराष्ट्रातल्या शिधावाटप केंद्रातील तांदूळ गुजरातला जातो. त्या ठिकाणी हा तांदूळ चढय़ा भावाने विकला जातो. त्या तांदळाचे तुकडे करून त्याच्यावर पॉलिशिंग केले जाते. वेगळय़ा पॅकेटमध्ये भरून तो तांदूळ निर्यात केला जातो. हे फार मोठे रॅकेट आहे. याची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान केली.
राज्यातील शिधावाटप केंद्रातून लाभार्थींना धान्याचा पुरवठा केला जातो. हा पुरवठा करणारा पुरवठादार जो आहे तो माल उचलतो, शिधावाटप दुकानात घेऊन जातो. शिधावाटप केंद्रात मागणी 100 पोत्यांची असेल तर वीसच पोती दिली जातात. रिसिटवर 100 पोती लिहून घेतात त्यावेळेस सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवतात. हा सर्व तांदूळ गुजरातला जातो. त्या ठिकाणी हा तांदूळ चढय़ा भावाने विकला जातो. त्या तांदळाचे तुकडे करून त्याच्यावर पॉलिशिंग होते. नंतर वेगळ्या पॅकेटमध्ये भरून तो तांदूळ निर्यात केला जातो. हे फार मोठे रॅकेट आहे. राज्यातील गरीब-सर्वसामान्यांसाठी तांदूळ देतो तो तांदूळ गरीबांच्या मुखात लागत नाही असा आरोप सुनील प्रभू यांनी केला.
मालाडला शिधावाटप केंद्राची गरज
मालाड पूर्वेसाठी स्वतंत्र शिधावाटप केंद्र मंजूरही झाले, पण जागेअभावी हे कार्यालय सुरू झाले नाही. महापालिकेकडे अनेक जागा उपलब्ध आहेत. मालाड पूर्व किंवा दिंडोशीमध्ये शिधावाटप कार्यालय झाले तर पाच लाख लोकसंख्येला फायदा होईल, असे सुनील प्रभू म्हणाले.




























































