Short news – बिष्णोई गँग खंडणी प्रकरण; शुभम लोणकरचा शोध सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्याशी मी स्वतः बोललो आहे. त्यांना पूर्ण सुरक्षा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बिष्णोई गँगचा शुभम लोणकर बाहेर राहून धमक्या देण्याचे फोन करतो आहे. त्याला शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. काँग्रेस विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत हा विषय आधी उपस्थित केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनीही पुन्हा हा विषय उपस्थित केला. काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिष्णोई गँगकडून 10 कोटींच्या खंडणीचा फोन आला असल्याचे ते म्हणाले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरील माहिती दिली.

मुंबई-गोवा रस्ता 18 वर्षांपासून रखडला

मुंबईगोवा महामार्ग कधी पूर्ण होणार याची लाखो मुंबईकर चाकरमानी आणि कोकणवासीय वाट पाहत आहेत, परंतु अद्याप या महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यात अनेक अडचणी येत आहेत. सरकारकडून अनेक डेडलाईन देण्यात आल्या, परंतु आजही या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रलंबित आहे. आज सरकारने विधानसभेत याची कबुली दिली. मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या 18 वर्षांपासून रखडले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने एका तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.

गिग कामगारांना मिळणार कायदेशीर संरक्षण

झोमॅटो, स्विगी, झेप्टो, ब्लिंकिट अशा ई-कॉमर्स कंपन्यांतील सुमारे दहा हजार डिलीव्हरी बॉय (गिग वर्कर) या असंघटित क्षेत्रातील कामगारांना विविध सामाजिक तसेच कल्याणकारी योजना लागू करण्यासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यादृष्टीने सामाजिक सुरक्षा संहितेमध्ये राज्याचे नियम प्रसिद्ध करण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरू आहे, अशी माहिती कामगार मंत्री  आकाश फुंडकर यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली.

पालघरची आरोग्य व्यवस्था ढासळली

पालघरमधील सरकारची आरोग्य व्यवस्था ढासळल्याचा मुद्दा आज विधान परिषदेत सत्ताधारी पक्षाच्या आमदार चित्रा वाघ, आमदार प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. यावर पालघरमधील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक घेण्याचे आश्वासन आरोग्य  राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.