
कोटय़वधी भाविकांचे आराध्य दैवत दख्खनचा राजा वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पर्यावरण रक्षणासाठी यंदा प्लॅस्टिक बंदीचा निर्णय कडकपणे राबवण्याचे निश्चित केले आहे. जोतिबा डोंगर परिसर स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
यात्रेदरम्यान भाविकांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे टाळून त्याऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेषतः यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी आगरबत्ती, दवना, खोबरे-वाटी आणि इतर पूजा साहित्यासाठी होणारे प्लॅस्टिक पॅकिंग आता पूर्णपणे बंद असणार आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह पन्हाळा व शाहूवाडी उपविभागाचे अधिकारी, देवस्थान समिती आणि स्थानिक ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. केवळ पूजा साहित्यच नव्हे; तर मिठाई, पेढे, खाद्यपदार्थ आणि खेळण्यांच्या पॅकिंगसाठीही प्लॅस्टिकचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. मंदिरात कोणत्याही प्रकारचे प्लॅस्टिक घेऊन प्रवेश असणार नाही. या नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यात्रेमध्ये अन्न वाटप करणाऱया स्वयंसेवी संस्थांनीही प्लॅस्टिक पिशव्या वा बाटल्यांचा वापर न करता पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱयांनी दिल्या आहेत.
कापडी पिशव्या रास्त भावात देणार
या उपक्रमास यश मिळवून देण्यासाठी स्थानिक व्यापाऱयांना कापडी पिशव्या रास्त भावात उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बैठकीला उपस्थित असलेल्या व्यापारी प्रतिनिधींनीही प्रशासनाच्या या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देत ‘प्लॅस्टिकमुक्त यात्रा’ यशस्वी करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच प्रत्येक भाविकाने सोबत कापडी पिशवी बाळगून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



























































