Rinku Singh Father passes away – क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे कर्करोगाने निधन, नोएडातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा क्रिकेटपटू रिंकू सिंह याचे वडील खाचंद्र सिंह यांचे निधन झाले आहे. उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते यकृताच्या कर्करोगाने ग्रस्त होते.

रिंकूच्या वडिलांना यकृताच्या कर्करोगाचे निदान झाले होते. कर्करोग चौथ्या स्टेजला पोहोचला होता. काही दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वडिलांची प्रकृती खालावल्याचे कळताच रिंकू सिंह टी-20 वर्ल्डकप अर्ध्यावर सोडून घरी परतला होता. रिंकूच्या वडिलांना मेकॅनिकल सपोर्टवर ठेवण्यात आले होते आणि सतत रेनल रिप्लेसमेंट थेरपीही देण्यात येत होती.

दरम्यान, चेन्नईत झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या लढतीसाठी रिंकू सिंह उपलब्ध होता. मात्र तो सराव सत्रामध्ये सहभागी झाला नाही. वडिलांची प्रकृती गंभीर असल्याचे कळताच तो तातडीने घरी परतला. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये टीम इंडियाचे बॅटिंग कोच सीतांशू कोटक यांनीही रिंकू वडिलांच्या आजारपणामुळे घरी परतल्याची माहिती दिली होती. तो लवकरच संघात सामील होईल असेही ते म्हणाले होते. मात्र आता वडिलांच्या दु:खद निधनामुळे तो पुढचे सामने खेळणार की नाही याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

टी-20 वर्ल्डकपमधील कामगिरी

दरम्यान, यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये रिंकू सिंह विशेष कामगिरी करू शकलेला नाही. यूएसएविरुद्ध तो 6 धावांवर, तर नामिबियाविरुद्ध 1 धाव काढून बाद झाला होता. पाकिस्तानविरुद्ध त्याने 4 चेंडूत 11 धावा केल्या होत्या. त्यानतंर नेदरलँडविरुद्ध तो 6 धावा काढून बाद झाला होता. सुपर-8मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या लढतीत त्याला भोपळाही फोडता आला नव्हता.