बदलापूर अंडाशय तस्करी प्रकरण, ठाण्यातील मालती आयव्हीएफ सेंटरमधून चालायचा गोरखधंदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंडाशय तस्करी प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. ठाण्यातील मालती आयव्हीएफ सेंटरमधून हा गोरखधंदा चालत असल्याची बाब समोर आली असून या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यातील सर्व आयव्हीएफ सेंटर व नर्सिंग होम्सची कसून झाडाझडती करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज दिले आहेत. त्यामुळे लवकरच हे धाडसत्र सुरू होणार आहे.

अंडाशय तस्करी घटनेची दखल राज्य महिला आयोगाने घेतली असून आज आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बदलापूरला भेट देऊन पोलीस व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. गर्भाशयातील अंडाशय काढून विकण्याच्या या प्रकरणामध्ये ठाण्यातील मालती आयव्हीएफ सेंटरचा मोठा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. नाशिकमध्ये या सेंटरचे प्रमुख केंद्र असून ठाण्याचे केंद्र हे बेकायदेशीर असल्याचेही दिसून आले आहे. गरजू महिलांना याच ठाण्यातील आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवले जायचे. हे सेंटर आता पोलिसांच्या रडारवर आले आहे. मालती आयव्हीएफ सेंटरसह सर्व आयव्हीएफ सेंटरची चौकशी करण्याचे आदेश रुपाली चाकणकर यांनी पोलीस उपायुक्त तसेच आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.