
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला 28 फेब्रुवारी रोजी एक महिना पूर्ण होत आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी रोहित पवार यांनी तीन वेळा पत्रकार परिषद घेत तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान रोहित पवार यांनी आता ते पुन्हा एक पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील धक्कादायक पुरावे सादर करणार असल्याचे सांगितले आहे.
रोहित पवार यांनी ट्विट करत याबाबत माहित दिली आहे. ”अजितदादांच्या दुर्दैवी अपघाताला उद्या एक महिना पूर्ण होत असून केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितल्याप्रमाणे उद्या AAIB चा प्राथमिक अहवाल येईल आणि या अहवालातून सत्य गोष्टी बाहेर येतील, अशी अपेक्षा आहे. येत्या सोमवारी आम्ही आमच्याकडे आलेली नवी माहिती आणि धक्कादायक पुरावे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहोत, त्यामुळे भूतकाळातील इतर घटनांप्रमाणे थातुरमातूर अहवाल देण्याचा प्रयत्न AAIB नक्कीच करणार नाही, ही अपेक्षा”, असे रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.
याप्रकरणी रोहित पवार बुधवारी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात VSR कंपनी व DGCA विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते मात्र त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यावेळी रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांची पोलीस अधिकाऱयांसोबत बाचाबाची झाली.
सर्व कार्यकर्त्यांना एफआयआर नोंदवण्याच्या सूचना
हा लढा केवळ आपला वैयक्तिक नसून राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा आहे. सर्व कार्यकर्त्यांनी आणि जनतेनेही आपापल्या भागात यासंदर्भात गुन्हा दाखल करावा, असे आवाहनही रोहित पवार यांनी केले.



























































