
>>गोरख तावरे<<
सातारा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका आणि डाव्या चळवळीतील ज्येष्ठ नेत्या कॉ. अंजलीताई प्रभाकर महाबळेश्वरकर यांचे पुणे येथे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने साताऱ्यातील डाव्या विचारसरणीचा लढवय्या आणि तत्त्वनिष्ठ आवाज हरपला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. प्रभाकर महाबळेश्वरकर यांच्या पत्नी होत. सातारा नगरपरिषदेच्या राजकारणात अंजलीताई यांनी विरोधी पक्षनेत्या म्हणून निडर भूमिका बजावली. सभागृहात सत्ताधाऱ्यांना जाब विचारताना त्यांची मांडणी नेमकी, अभ्यासपूर्ण आणि तडजोड न करणारी असे. आपल्या तत्त्वांशी प्रामाणिक राहणे आणि लोकहिताच्या प्रश्नांवर कोणतीही भीड न बाळगता आवाज उठवणे, ही त्यांची ओळख होती. नगरपरिषदेतील त्यांचा कार्यकाळ हा केवळ पदाचा नव्हता, तर जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याचा काळ म्हणून ओळखला जातो.
महाबळेश्वरकर दाम्पत्याने साताऱ्यातील प्रस्थापित राजकारणाला थेट आव्हान दिले. शहरातील पाणीपुरवठा, नागरी सुविधा, झोपडपट्टय़ांचे प्रश्न, कामगारांचे हक्क आणि भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ांवर त्यांनी सातत्याने भूमिका घेतली. चौकाचौकांत पुठ्ठय़ांवर प्रश्न लिहून फलक लावून प्रशासनाचे लक्ष वेधण्याची त्यांची आगळी पद्धत त्या काळात विशेष चर्चेचा विषय ठरली होती.
साताऱ्यातील मंगळवार पेठेतील दुमजली कौलारू घर हे कम्युनिस्ट पक्ष आणि कामगार-कष्टकरी चळवळीचे केंद्र म्हणून ओळखले जात होते. येथे विविध बैठका, शिबिरे आणि मोर्चांचे नियोजन होत असे. अनेक राष्ट्रीय स्तरावरील डावे नेते-कार्यकर्ते येथे येत असत. जागतिक कामगार दिनाच्या मोर्चांत सहभागी होणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांची व्यवस्था अंजलीताईंनी साध्या, पण आत्मीयतेने केलेल्या जेवणातून केली होती.
महाबळेश्वरकर दांपत्याने सुमारे पाच दशके सातारा जिह्यातील कामगार-कष्टकरी आणि पुरोगामी चळवळीचे नेतृत्व करताना मोठा त्याग केला.
नगरसेवक पदाव्यतिरिक्त इतर कोणतेही पद न मिळूनही पद हे त्यांच्यासाठी गौण राहिले. काही वर्षांपूर्वी प्रभाकर महाबळेश्वरकर यांचे निधन झाल्यानंतरही अंजलीताईंनी चळवळीतील कार्य सुरू ठेवले. आपल्या संयुक्त बचत खात्यातील उरलेली रक्कम पक्षाला देणगी म्हणून देत त्यांनी सामाजिक बांधिलकीची जपणूक केली.
डाव्या चळवळीतील अनेक ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या निधनानंतर आता अंजलीताई यांच्या जाण्याने चळवळीत न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.


























































