पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंच्या ब्रीफिंगला दांडी मारणे भोवले, सनदी अधिकारी देवेंद्र सिंग निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधिमंडळच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या ब्रीफिंग बैठकीला दांडी मारणे सनदी अधिकाऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. ब्रिफिंग बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव एम. देवेंद्र सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर मंडळाचे सहसंचालक सतीश पडवळ यांच्यावरही निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बोलावलेल्या बैठकीला पर्यावण महामंडळाचे सचिव आणि सनदी अधिकारी एम. देवेंद्र सिंग हे गैरहजर होते. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेकांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेतली होती. या अधिकाराच्या विरुद्ध हक्कभंग आणण्याची तयारी सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. विधानसभेत याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी देवेंद्र सिंग यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आज सामान्य प्रशासन विभागाने तातडीने देवेंद्र सिंग यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

काय आहेत आदेश

सामान्य प्रशासन विभागाने देवेंद्र सिंग यांना निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश शुक्रवारी काढले. निलंबन काळात देवेंद्र सिंग यांचे मुख्यालय मुंबई येथे असेल. त्यांनी कोकण विभागीय आयुक्तांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. निलंबन कालावधीत सिंग यांना महागाई भत्ता, निर्वाह भत्ता आणि इतर भत्ते देण्यात येतील. यासाठी त्यांनी इतर कोणत्याही नोकरी, व्यवसाय, पेशा किंवा उपजीविकेत गुंतलेले नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. मात्र वरील अटींचे कोणतेही उल्लंघन केल्यास ते गैरवर्तन समजले जाईल व त्यांच्यावर पुढील शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांना देण्यात आला आहे.