
चार दिवसांपूर्वी पाकिस्तानने केलेल्या कारवाईनंतर अफगाणिस्तानने गुरुवारी रात्री उशिरा प्रत्युत्तर देत पाकिस्तानवर हल्ला केला. अफगाणिस्तानने पाकिस्तानी लष्कराच्या 15 चौक्यांचा ताबा मिळवला आहे. त्यानंतर पाकिस्ताननेही अफगाणिस्तानात हवाई हल्ले केले. यामुळे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात युद्धपरिस्थिती निर्माण झाली आहे. या संघर्षात सुमारे 200 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अफगाणिस्तानने हल्ला करत पाकिस्तानच्या नंगरहार नूरिस्तान, कुनार, खोस्त, पक्तिया आणि पक्तिका यांसारख्या सीमेलगतच्या भागांमध्ये असलेल्या 15 चौक्या ताब्यात घेतल्या. या कारवाईत पाकिस्तानचे 55 सुरक्षा कर्मचारी मारल्याचा दावा तालिबानचे प्रवत्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी केला आहे. पाकिस्तानने पुन्हा हल्ला केला तर अफगाणिस्तान आणखी जोरदार प्रत्युत्तर देईल, असा इशारा अफगाणिस्तानचे लष्करप्रमुख फसिहुद्दीन फितरत यांनी दिला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये मोठा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. या संघर्षावर संवादातून तोडगा काढावा, अशी भूमिका अनेक देशांनी मांडली आहे.
हिंदुस्थानचा अफगाणिस्तानला पाठिंबा
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवत्ते रणधीर जयस्वाल यांनी ‘एक्स’वर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाला, प्रादेशिक अखंडतेला आणि स्वातंत्र्याला हिंदुस्थानचा पाठिंबा आहे याचा आम्ही पुनरुच्चार करतो, असे या निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.

























































