नैतिक भ्याडपणाचे प्रदर्शन, पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्यावर जयराम रमेश यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यावर तीव्र टीका केली आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणविरोधात संयुक्त लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर त्यांनी सामाजिक माध्यम ‘एक्स’वरील पोस्टद्वारे प्रतिक्रिया नोंदवली.

जयराम रमेश म्हणाले की, पंतप्रधानांनी इस्रायल दौऱ्याचा आनंद साजरा केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर संयुक्त हल्ला चढवला. मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या लष्करी जमावाकडे पाहता ही कारवाई पूर्णपणे अपेक्षित होती, असे त्यांनी नमूद केले.

तरीही पंतप्रधानांनी इस्रायलला भेट देण्याचा निर्णय घेतला आणि तेथे “उच्चतम स्तरावरील नैतिक भ्याडपणाचे प्रदर्शन” केल्याचा आरोप त्यांनी केला. “भारत इस्रायलसोबत उभा आहे,” अशी घोषणा करून त्याबद्दल स्वतःलाच पुरस्कार मिळवून घेतल्याचा टोला त्यांनी लगावला.

रमेश यांनी पुढे म्हटले की, हा इस्रायल दौरा आधीच लज्जास्पद होता आणि आता तो अधिकच लज्जास्पद वाटत आहे, कारण युद्धाची सुरुवात त्या दोन नेत्यांकडून झाली आहे ज्यांना पंतप्रधान मोदी आपले जवळचे मित्र म्हणत आले आहेत. या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.