इराणचे आयर्न मॅन… अयातुल्लाह खामेनी, शाह राजवटीच्या विरोधातील लढ्यातून आले प्रकाशझोतात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका व इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. तीन दशकांहून अधिक काळ इराणचे सर्वसत्ताधीश राहिलेल्या खामेनी यांनी इराणला स्वाभिमानी राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर आणले. भले भले देश अमेरिकेसह पाश्चात्त्य देशांपुढे माना टाकत असताना खामेनी झुकले नाहीत. पाश्चात्त्य कारस्थानांना पुरून उरत त्यांनी इराणवर सत्ता गाजवली. ते इराणचे ‘आयर्न मॅन’ म्हणून ओळखले जात होते. त्यामुळेच त्यांचा मृत्यू हा इराणवरचा आघात मानला जात आहे.

शियांचे पवित्र शहर मानल्या जाणाऱ्या इराणच्या ईशान्येकडील मशीदमध्ये 1939 साली खामेनी यांचा जन्म झाला. इराणमधील शाह राजवटीच्या विरोधातील लढ्यातून ते प्रकाशझोतात आले. या लढ्यात त्यांना सहा वेळा तुरुंगवास भोगावा लागला. या लढ्याला यश येऊन 1979 साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली. 1981 ते 1989 अशी आठ वर्षे ते इराणच्या अध्यक्षपदी होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली इराणने इराक विरुद्ध युद्ध लढले. या काळात बहुतेक देश इराकच्या बाजूने उभे राहिले. अयातुल्लाह रुहोल्लाह खोमेनी यांच्या मृत्यूनंतर 1989 साली खामेनी यांची देशाच्या सर्वोच्च पदी निवड झाली. इराण युद्धाचा अनुभव असलेल्या खामेनी यांनी देशाची सर्वोच्च सूत्रे हाती घेताच इराणला वेगळ्या पद्धतीने आकार देण्याचा प्रयत्न सुरू केला.

इराणची लष्करी ताकद वाढवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. बाह्य संकटांपासून इराणचे रक्षण करण्यासाठी त्यांनी पावले टाकायला सुरुवात केली. आक्रमण हाच बचाव ही त्यांची युद्धनीती होती. इराणचा वादग्रस्त अण्वस्त्र व क्षेपणास्त्र कार्यक्रम त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू होता. खामेनी यांच्या काळात इराणमध्ये अनेक नेते अध्यक्ष झाले. मात्र, देशाची सूत्रे कायम खामेनी यांच्या हातात राहिली.

अमेरिका एक नंबरचा शत्रू

खामेनी हे स्वतः कायम साधे आयुष्य जगले. मात्र, त्यांच्या काही ठाम भूमिकांची किंमत देशातील जनतेला मोजावी लागली. आंतरराष्ट्रीय पातळीवर इराण कायम एकाकी पडला. अमेरिका हा आपल्या देशाचा नंबर एकचा शत्रू आहे असे ते जाहीरपणे सांगत. अण्वस्त्र निर्मितीचे संपूर्ण ज्ञान व अनुभव आल्याशिवाय हा प्रकल्प थांबवण्यास किंवा त्यावर मर्यादा आणण्यास त्यांचा विरोध होता. तो त्यांनी अखेरपर्यंत सोडला नाही.

दुबई विमानतळावर ड्रोन डागल्याने खळबळ

अमेरिकेचे लष्करी तळ सांभाळणाऱ्या आखाती देशांना इराणने लक्ष्य केले आहे. याचा सर्वाधिक फटका दुबईला बसला आहे. इराणने दुबईतील विमानतळ, पाम जुमेराह आणि बुर्ज अल अरब या जगप्रसिद्ध हॉटेलांवर हल्ले केले. यातून बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत थोडक्यात बचावली. इराणने रविवारी दुबई विमानतळावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात चार जण जखमी झाले. हल्ल्यानंतर संपूर्ण विमानतळावर धुराचे लोट पसरले आणि एकच घबराट उडाली. सगळीकडे पळापळ सुरू झाली. विमानतळ प्रशासनाने तातडीने हालचाली करून संपूर्ण विमानतळ रिकामे केले. सध्या दुबई विमानतळावरून विमान सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

 

गोवंडी मुस्लिम युथ फ्रंटने मुंबईतील गोवंडी येथील शिवाजी नगर येथे शांततापूर्ण  मोर्चा काढला, अयातुल्ला सय्यद अली खामेनी यांना प्रतिकात्मक शहीददेऊन सन्मानित करण्यात आले.

 

मुंबई, श्रीनगरमध्ये निदर्शने

खामेनी यांच्या हत्येनंतर इराणच्या समर्थनार्थ मुंबईसह देशभरात आज हजारो शिया मुस्लिम बांधवांनी रस्त्यावर उतरून अमेरिका व इस्रायलच्या विरोधात निदर्शने केली. जम्मू-कश्मीरमध्ये श्रीनगर, बडगाम येथे लोक रस्त्यावर उतरली. लेहमध्येही मोठा निषेध मोर्चा काढण्यात आला. लखनऊमध्येदेखील इस्रायल व अमेरिकेचा निषेध केला.

 

आता बदला घेणार!

इराणने अमेरिका व इस्रायलला उघड धमकी दिली. ‘आमच्या प्रिय नेत्याने बलिदान दिले आहे. ते व्यर्थ जाणार नाही. आम्ही बदला घेणार, असे इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी एका रेकॉर्डेड संदेशाद्वारे स्पष्ट केले. ‘इराणच्या हंगामी नेतृत्व मंडळाने काम सुरू केले आहे. इराणचे लष्कर शत्रूचे तळ पूर्णपणे चिरडून टाकेल,’ असा इशारा त्यांनी दिला.