आगा जाणार की हटवला जाणार? पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी केली क्रिकेटची नेतृत्व कोंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानच्या विश्वचषक मोहिमेचा पडदा पडताच एकच प्रश्न पाकिस्तानभर घुमू लागला आहे. तो म्हणजे सलमान अली आगा स्वतःहून कर्णधारपद सोडणार की पीसीबी त्याला बाजूला करणार? मैदानावरील पराभवापेक्षा आता चर्चेचा पेंद्रबिंदू ठरले आहे पाकिस्तानी नेतृत्व. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी संघाच्या पराभवाची चिरफाड करताना नेतृत्वाला काsंडीत अडकवलेय.

सलग चौथ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्यात पाकिस्तानी संघाला अपयश आलेय. हा केवळ आकडा नाही, तर पाकिस्तान क्रिकेटच्या ढासळत्या रचनेचा आरसा आहे. प्रत्येक स्पर्धेनंतर नवे चेहरे, नवे प्रयोग, नवी आश्वासने, पण निकाल मात्र तोच. सुपर-8 मध्ये मोठय़ा फरकाने विजय हवा असताना फलंदाजांनी थोडीशी झुंज दिली; पण गोलंदाजी विभागाने निर्णायक क्षणी हात टेकले. गणित चुकले आणि स्वप्न भंगले.

त्यामुळे पराभवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आगाला थेट सवाल करण्यात आले. ‘आता तुम्ही स्वतःहून बाजूला होणार की तुम्हाला हटवले जाईल?’ हा प्रश्न केवळ एका कर्णधाराला नव्हे, तर संपूर्ण व्यवस्थापनाला उद्देशून होता. आगाने संयम राखत आपण कोणताही निर्णय भावनेतून घेणार नसल्याचे सांगितले, पण पाकिस्तानच्या क्रिकेट संस्कृतीत संयमाला किती किंमत आहे, हा खरा मुद्दा आहे.

कर्णधारपदावरून वारंवार बदल, निवड प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि रणनीतीतील सातत्याचा अभाव, या सगळय़ा कारणांची चिरफाड आता उघडपणे होत आहे. जबाबदारी सामूहिक असल्याचे आगा सांगत असला तरी प्रत्येक वेळी बळीचा बकरा मात्र कर्णधारच ठरतो, ही वस्तुस्थिती आहे.

आता चेंडू पीसीबीच्या कोर्टात आहे. आगा टिकणार की नेतृत्वात मोठी उलथापालथ होणार? पाकिस्तान क्रिकेट एका निर्णायक वळणावर उभे आहे. प्रश्न केवळ कर्णधाराचा नाही, तर दिशाहीन होत चाललेल्या व्यवस्थेचा आहे. बदल होणार की पुन्हा एकदा फक्त चेहरे बदलतील? उत्तर लवकरच मिळेल आणि तेच पाकिस्तान क्रिकेटच्या भवितव्याचा सूर ठरवतील.