
>> मंगेश वरवडेकर
वानखेडे म्हणजे केवळ मैदान नाही, ती मुंबईच्या क्रिकेटची धडधड आहे. आणि या धडधडीवरच उद्या हिंदुस्थान इंग्लंडशी दोन हात करणार आहे. अमेरिकेला हरवून हिंदुस्थानचा आत्मविश्वास उंचावलेला असला तरी इंग्लिश खेळाडू सध्या तुफान फॉर्मात आहेत. पण त्यांना ठाऊक आहे की, वानखेडेवर मुंबई इंडियन्सची सावली हिंदुस्थानच्या मागे उभी आहे. तीच खरी हिंदुस्थानची ताकद आहे. त्या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा गजर वानखेडेवर ऐकायला मिळणार आहे.
हिंदुस्थानच्या टी-20 संघात मुंबई इंडियन्सचे एक-दोन नव्हे तर चारचौघे आहेत. एक म्हणजे सूर्यकुमार यादव जो संघाचाच कर्णधार आहे तर दुसरा हार्दिक पंडय़ा मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. तसेच हिंदुस्थानी गोलंदाजीचा कणा असलेला जसप्रीत बुमरा आणि मधल्या फळीतला तिलक वर्मा असे चार सुपरस्टार यांच्यासाठी वानखेडेची खेळपट्टी म्हणजे अंगणच. त्यामुळे वानखेडेची खेळपट्टीचा रागरंग या चौघांना इतरांपेक्षा अधिक माहीत असल्यामुळे याचा फायदा हिंदुस्थानलाच होणार.
अभिषेकच्या वादळाची प्रतीक्षा
सूर्या, हार्दिक, बुमरा आणि तिलक हे मुंबई इंडियन्सचे स्टार असले तरी हिंदुस्थानी चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती अभिषेक शर्माच्या वादळाची. हा वर्ल्ड कप हिंदुस्थानच्या या वादळाला अद्याप फळलेला नाही. पण अभिषेकने याच मैदानावर गेल्या वर्षी 54 चेंडूंत 13 षटकारांच्या पराक्रमासह ठोकलेली 135 धावांची खेळी आजही मुंबईकरांच्या आणि हिंदुस्थानींच्या मनात जशीच्या तशी आहे. त्यावेळी अभिषेकने जोफ्रा आर्चर, जॅमी ओव्हरटन, आदिल राशीद या तिघांना अक्षरशः पह्डून काढले होते. आताही ते तिघे खेळणार आहेत. यंदा अभिषेक त्या शतकाची पुनरावृत्ती करत हिंदुस्थानला सलग दुसऱयांदा टी-20 वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठून देईल, असा सर्वांना विश्वास आहे.
इंग्लंडकडे जॅक्सचा तुरूप
इंग्लंडकडेही मुंबईचा एक ‘गुप्तहेर’ आहे. तो म्हणजे धडाकेबाज सुपरस्टार विल जॅक्स. तो यंदाचा वर्ल्ड कप गाजवतोय.
जॅक्सलाही वानखेडेचे सर्व खाचखळगे माहीत असल्यामुळे त्याचाही फायदा इंग्लिश संघाला होणार, याबाबत तीळमात्र शंका नाही. त्यामुळे गुरुवारी हिंदुस्थानविरुद्ध इंग्लंड अशी लढत असली तरी या लढतीत मुंबई इंडियन्सच्या कोणत्या खेळाडूची चालते याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.


























































