
एक्सप्लोझिव्ह कंपन्यांमध्ये वारंवार घडत असलेल्या अशा घटनांमुळे कामगारांची सुरक्षा धोक्यात आल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दिला होता. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याकडे केलेले दुर्लक्ष आणि बेफिकिरीमुळे नागपूरमधील एलबीएल एनर्जी कंपनीत स्फोट होऊन मनुष्यहानी झाल्याचा संताप व्यक्त होत आहे.
नागपूरमधील बाजारगाव तालुका परिसरातील एक्सप्लोझिव्ह कंपन्यांमध्ये वारंवार स्फोट होत आहेत. यामध्ये गेल्या दोन वर्षांत जवळपास 23 कामगारांचा नाहक मृत्यू झाला असून अनेक कामगारांना कायमचे अपंगत्व आले आहे. एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये वारंवार स्फोट होत असल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याची गंभीर दखल घेऊन स्फोटके तयार करणाऱया सर्व कंपन्यांचे सेफ्टी ऑडिट करा, अशी मागणी सप्टेंबर 2025 मध्ये अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
एक्सप्लोझिव्ह कंपन्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोणातून आवश्यक खबरदारी न घेतल्यामुळे स्फोट होत असल्याचे दिसून येत आहे. राज्य व पेंद्र सरकारने सेफ्टी ऑडिटसाठी एक तज्ञ समिती तयार करण्याची आवश्यकता असल्याचे अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते, मात्र त्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे एलबीएल एनर्जी कंपनीत स्फोट होऊन मनुष्यहानी झाल्याचा संताप व्यक्त होत आहे.
या कंपन्यांची सुरक्षा तपासणी आवश्यक
सोलार एक्सप्लोझिव्ह इंडस्ट्रीज, इकोनॉमिक्स एक्सप्लोझिव्ह कंपनी, केलटेक एक्सप्लोझिव्ह, चामुंडी एक्सप्लोझिव्ह, डिफेन्स एक्सप्लोझिव्ह, ओरिएंटेड एक्सप्लोझिव्ह, एशियन फायर वर्क, सोलर एक्सप्लोझिव्ह, एस.बी.एल. एक्सप्लोझिव्ह, अमिनो एक्सप्लोझिव्ह
एसबीएलच्या 11 अधिकाऱ्यांना अटक, मालक फरार
एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटाप्रकरणी कंपनीने मोठा हलगर्जीपणा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. प्रक्रिया झालेल्या स्फोटकांना दुसऱया इमारतीत न हलवता किंपिंग युनिटमध्येच साठवण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी सुरक्षा तपासणीत अनेक त्रुटी आढळल्या होत्या. कंपनीने त्यावेळी दिलेल्या सूचनांचे पालन केले असते, तर 19 कामगारांचे प्राण वाचले असते. याप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकांसह 11 आरोपींना अटक केली असून कंपनीचा मालक आलोक चौधरी हा अद्याप फरार आहे.
























































