देशी गाय संशोधन केंद्रास अजित पवारांचे नाव; लाडकी बहीण योजनेस ‘दादां’च्या नावाचा प्रस्ताव बारगळला?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत देशी गाईंचे संगोपन आणि संवर्धन तसेच दूध, दुग्धजन्य उत्पादने, गोमूत्र आणि शेण प्रक्रियेवरील संशोधनासाठी कार्यरत असलेल्या देशी गाय संशोधन आणि  प्रशिक्षण केंद्राचे ‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन आणि  प्रशिक्षण केंद्र’ असे नामकरण करण्यास मान्यता देण्यात आल्याची  माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेची  122वी बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती भरणे यांनी दिली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून नावीन्यपूर्ण अशा देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली होती. देशी गायींच्या मौल्यवान, दुर्मीळ प्रजातींचे जतन, त्यांची दुग्धक्षमता वाढवणे तसेच शाश्वत शेतीसाठी शेतकऱयांना मार्गदर्शन करणे या महत्त्वाच्या बाबींवर या केंद्रामार्फत कार्य सुरू आहे. त्यांच्या पश्चात या केंद्रास त्यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याची आणि  स्मृतीची जपणूक करण्यात येणार असल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले. या केंद्रासाठी गोशाळा, सिलो बंकर, बायोगॅस युनिट्स, कंपोस्टिंग आणि स्टोरेज युनिट्स, प्रयोगशाळा, शेतकरी वसतिगृह, प्रशिक्षण हॉल तसेच प्रशासकीय आणि  निवासी इमारती आदी कामांसाठी टप्पा-2 अंतर्गत 56 कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत, असे भरणे यांनी सांगितले.

अजित पवार गटाचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. त्यावर लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांचे नाव देण्याच्या मागणीबाबत आम्ही एकत्र बसू आणि त्यावर काय करायचे याचा विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी महिन्यातील हरिद्वार दौऱयात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिले. पण आता देशी गाय संशोधन केंद्राला अजित पवार यांचे नाव दिल्यामुळे लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांचे नाव देण्याच्या मागणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.