संगमनेरात 11 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरात वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या तस्करीवर शहर पोलिसांनी शनिवारी (दि. 1) रात्री धडक कारवाई करत तब्बल 11 लाख रुपयांचा गांजा आणि चारचाकी वाहन जप्त करून दोन आरोपींना अटक केली. या कारवाईमुळे शहरातील गांजा तस्करीच्या अवैध जाळ्याचा पर्दाफाश झाला आहे.

प्रथमेश उर्फ पोपट राऊत (वय 26, रा. घुलेवाडी) आणि प्रथमेश सुरेश गोलवड (वय 21, रा. शिर्डी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कर्मचारी विजय खुळे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी प्रथमेश राऊत, प्रथमेश गोलवड यांना रात्री सापळा रचून ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान आरोपींकडून 21 किलो 490 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची बाजारातील किंमत सुमारे 6 लाख 44 हजार रुपये आहे. तसेच तस्करीसाठी वापरण्यात आलेली चारचाकी गाडीही जप्त केली. या कारवाईत एकूण 10 लाख 94 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांना मिळालेल्या माहितीनंतर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने काकडी विमानतळ परिसरापासून संशयित वाहनाचा पाठलाग करत संगमनेरजवळील सुकेवाडी येथे आरोपींना ताब्यात घेतले. दरम्यान, प्रथमेश उर्फ भैया पोपट राऊत हा गांजा तस्करीतील अट्टल गुन्हेगार असून, त्याच्यावर नाशिक येथेही यापूर्वी गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शहर व ग्रामीण भागात गांजा विक्रीचे जाळे उभे करण्यामागे त्याची भूमिका असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, बाबासाहेब सातपुते, विजय खुळे, राहुल पांडे, विजय आगलावे, राहुल नागरे, अतुल उंडे, राहुल क्षीरसागर, विजय खेडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.