
एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी ज्येष्ठ नागरिकांना पहाटे ४ वाजल्यापासून हेलपाटे मारावे लागत आहेत. महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचा खोपट डेपोत तासन्तास उभे राहून जीव मेटाकुटीला आला आहे. डेपोत २०० ते २५० ज्येष्ठ नागरिक, महिला सकाळपासून याठिकाणी उभ्या असतात. दिवसाला १२० टोकन दिल्यानंतर खिडकी बंद करण्यात येते. त्यामुळे अनेकांना कार्ड न घेताच परत जावे लागत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, ६५ वर्षांवरील सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिक, १८ वर्षांवरील महिला नागरिक तसेच विद्यार्थी, दिव्यांग आणि इतर लाभार्थ्यांसाठी खोपट डेपोत स्मार्ट कार्डसाठी नोंदणी सुरू आहे. त्यामुळे खोपट डेपोत सकाळी ९:३० वाजल्यापासून १२० टोकन दिले जाते. टोकन मिळवण्यासाठी सुमारे २५० ज्येष्ठ नागरिक, महिला पहाटे चार वाजल्यापासून ताटकळत उभ्या असतात. टोकन पूर्ण झाले की उर्वरित नागरिक घरी जातात आणि पुन्हा पहाटे चार वाजता रांगेत उभे राहून साडेनऊ वाजेपर्यंत ताटकळत थांबतात. तसेच दिवसभर चौकशी करण्यासाठी बरेच जण हेलपाटे मारतात.



























































