
तामीळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी द्रमुकने जोरदार मोर्चेबांधणी केली असून 21 पक्षांची महाआघाडी स्थापन केली आहे. काँग्रेस पक्षाचाही यात समावेश असून हा पक्ष तामीळनाडूत 28 जागा लढणार आहे.
तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सेल्वापेरुन्थागाई यांच्यात झालेल्या बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विधानसभेचे जागावाटप करतानाच काँग्रेसला राज्यसभेची एक जागा देण्यात आली आहे.
द्रमुकला टीव्हीकेचे आव्हान
आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी द्रमुकपुढे अण्णा द्रमुक आणि अभिनेता विजय यांच्या नव्या टीव्हीके पक्षाचे आव्हान आहे. तामिळ सुपरस्टार असलेल्या विजय यांच्या जाहीर सभांना जनतेचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. भारतीय जनता पक्षही तामीळनाडूत शिरकाव करण्यासाठी जंगजंग पछाडत आहे. त्यामुळे स्टॅलिन सावध झाले आहेत. त्यांनी जास्तीत जास्त पक्षांची मोट बांधत मतांची बेरीज करण्यावर भर दिला आहे.

























































