
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संशयास्पद मृत्यूसंदर्भात जमा केलेल्या सर्व पुराव्यांबाबत त्यांनी उद्धव ठाकरे यांना माहिती दिली आणि दादांना न्याय मिळवून देण्यासाठी संसदेत आवाज उठवण्यास सहकार्य करा, अशी विनंती केली.
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पह्टो शेअर करत या भेटीची माहिती दिली. उद्धव ठाकरे यांना आपण अजितदादांच्या मृत्यूप्रकरणी सर्व पुराव्यांसह सविस्तर माहिती दिली. महाविकास आघाडीतील एक प्रमुख घटक पक्ष म्हणून या विषयाच्या निष्पक्ष चौकशीकामी आणि अजितदादांना न्याय मिळावा यासाठी पूर्ण ताकदीने सोबत असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी दिला, असे रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजितदादांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत केलेल्या कामांनाही उजाळा देण्यात आला, असे रोहित पवार म्हणाले.






























































