
>> मंगेश वरवडेकर
जगज्जेतेपदाच्या दिशेने झेप दोघांनाही घ्यायची आहे. हिंदुस्थानी संघाला जगज्जेतेपद राखण्याच्या दिशेने अजून एक दमदार पाऊल टाकायचे आहे, तर इंग्लंडला चार वर्षांपूर्वीच्या पराक्रमाची पुनरावृत्ती करून पुन्हा जगावर राज्य करायचे आहे. ध्येय एकच-अंतिम फेरी. मात्र त्या दिशेने जाणारा दरवाजा उघडतो तो वानखेडे स्टेडियमवर. आज या ऐतिहासिक मैदानावर जे घडेल, ते केवळ सेमीफायनलचे निकाल ठरवणार नाही; ते दोन्ही संघांच्या स्वप्नांचे भवितव्य ठरवणार आहे. कुणाचे स्वप्न फुलते आणि कुणाचे तुटते, याचा निर्णय या महासंग्रामात होणार आहे.
हिंदुस्थानचा आत्मविश्वास, चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा
हिंदुस्थानचा संघ या स्पर्धेत गतविजेता म्हणून उतरला आहे. त्यामुळे अपेक्षा प्रचंड आहेत. पण या संघाकडे त्या अपेक्षा पेलण्याची ताकदही आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव हा एक धक्का होता; पण त्यानंतर वेस्ट इंडीजविरुद्धचा तणावपूर्ण विजय संघाच्या जिद्दीचे उदाहरण ठरला. संकटक्षणी हा संघ मागे हटत नाही, उलट अधिक आक्रमक होतो. हीच त्याची खरी ओळख आहे आणि आता वानखेडेवर हिंदुस्थानच्या खेळाडूंना मिळणारा प्रेक्षकांचा पाठिंबा म्हणजे जणू बारावा खेळाडूच.
संजू सॅमसनची बॅट तळपणार
या स्पर्धेत हिंदुस्थानच्या संघाची खोली पुन्हा एकदा दिसून आली. रिंकू सिंगला कौटुंबिक कारणामुळे बाहेर जावे लागले आणि संधी मिळाली संजू सॅमसनला. पण सॅमसनने ती संधी पकडली नाही तर जणू तिला घट्ट मिठी मारलीय. ईडन गार्डन्सवर 50 चेंडूंत नाबाद 97 धावांची खेळी करत त्याने सामना हिंदुस्थानच्या बाजूने झुकवला. ज्या खेळाडूने वर्षभरात फारशी चमक दाखवली नव्हती, त्याने एका डावात संपूर्ण स्पर्धेचा सूर बदलला. हेच या संघाचे वैशिष्टय़-इथे प्रत्येक खेळाडू सामना जिंकण्याची ताकद ठेवतो.
बुमरासमोर इंग्लंडची कसोटी
हिंदुस्थानचा सर्वात मोठा तुरुपाचा पत्ता म्हणजे जसप्रीत बुमरा. त्याचा प्रत्येक स्पेल म्हणजे फलंदाजांसाठी प्रश्नपत्रिका असते आणि उत्तर बहुतेक वेळा चुकतेच. वेस्ट इंडीजविरुद्ध 12 व्या षटकात घेतलेल्या दोन विकेट्सनी त्याने सामना पलटवला. अशीच एखादी झंझावाती स्पेल आज इंग्लंडच्या स्वप्नांवर पाणी फेरू शकते. इंग्लंडकडे जोफ्रा आर्चरसारखा वेगवान गोलंदाज आहे, पण हिंदुस्थानच्या फलंदाजीसमोर त्यालाही कसोटीला सामोरे जावे लागणार आहे.
इतिहासाची पुनरावृत्ती की नवा अध्याय?
2022 मध्ये इंग्लंडने ऍडलेडमध्ये हिंदुस्थानला दहा विकेट्सने हरवले आणि नंतर विजेतेपद मिळवले. दोन वर्षांनी हिंदुस्थानने गयानामध्ये त्याच इंग्लंडला दणदणीत हरवून बदला घेतला. म्हणजेच या दोन संघांच्या लढती केवळ सामने नसतात. त्या इतिहास लिहितात. आजही इतिहासाची पुनरावृत्ती होईल.
मुंबई इंडियन्स आली रे
सामना हिंदुस्थान-इंग्लंडचा असला तरी या सामन्यात मुंबई इंडियन्सची ताकद दिसणार आहे. हिंदुस्थानी संघात सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंडय़ा, तिलक वर्मा आणि जसप्रीत बुमरा ही इंडियन्स चौकडी आहेच, पण सोबतीला मुंबईकर शिवम दुबे आणि वानखेडेच्याच अंगाखांद्यावर खेळलेला इशान किशन हे सारे संघात आहेत. दुसरीकडे इंग्लंडला विल जॅक्सही इंडियन्सचाच भाग आहे. त्यामुळे वानखेडेचा प्रत्येक खड्डा माहीत असलेले हे ‘सेव्हन स्टार’ पुन्हा एकदा आपल्या आवडत्या मैदानावर उतरणार आहेत. आता यापैकी कोण आपली ताकद दाखवतो, याकडे तमाम मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
तिकिटांसाठी फिल्डिंग
क्रिकेटप्रेमी वानखेडेवर नेपाळचा सामना असला तरी 25 हजार क्रिकेटप्रेमींची गर्दी होते. आता तर हिंदुस्थान खेळतोय आणि तेसुद्धा उपांत्य फेरीत. म्हणजे तिकीट मिळणे निव्वळ अशक्यच. या सामन्याचे तिकीट मिळावे म्हणून क्रिकेटवेडय़ांनी बुधवारीच फिल्डिंग लावली होती आणि ‘कुणी तिकीट विकतो का तिकीट’चा आवाज सुमडीत काढत होते. विशेष म्हणजे तिकीट विकल्याही जात होत्या. आजही तिकीट दराच्या चारपट किमतीत तिकीट विकल्या जात होत्या. त्यामुळे आज तुमच्याकडे तिकीट नसेल आणि सामना पाहण्याची इच्छा असेल तर आपल्या वॉलेटमध्ये किमान दहा हजार रुपये घेऊन यावे लागतील. अन्यथा वानखेडेच्या परिसरात फिरकूही नये.




























































