
एकीकडे महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणाच्या बढाया मारणाऱया भाजप-शिंदे सरकारच्या काळात महिला आणि मुली असुरक्षित असल्याची चिंताजनक स्थिती सरकारनेच दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. राज्यात 2024 मध्ये 45 हजार 662 महिला हरवल्या होत्या, तर 2025 या एकाच वर्षात तब्बल 48 हजार 278 महिला हरवल्या आहेत. तर 2024 मध्ये 11 हजार 316 मुली हरवल्या होत्या, तर 2025 मध्ये 12 हजार 113 मुली हरवल्या आहेत. म्हणजेच 2024 च्या तुलनेत महिला 2613 तर 797 मुली गतवर्षीच्या तुलनेत जास्त हरवल्या आहेत. याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच विधान परिषदेत माहिती दिली.
राज्यात बेपत्ता होणाऱया अल्पवयीन मुले, मुली आणि महिलांबाबत भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत मुद्दा उपस्थित केला. हरवलेल्या महिला, मुली शोधण्यासाठी सरकार कोणत्या उपाययोजना करीत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी सरकार महिला, मुलींच्या सुरक्षेसाठी ‘ऑपरेशन मुस्कान’, ‘ऑपरेशन शोध’, पोलिसांची गस्त वाढवणे, पोलीस काका, पोलीस दीदी, सर्व पोलीस पोलीस ठाण्यांत महिला मदत कक्ष आणि शाळांमध्ये मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी ‘सेफ्टी ऑडिट’ करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सरकार म्हणते…
‘ऑपरेशन मुस्कान’अंतर्गत आतापर्यंत एकूण 41 हजार 193 लहान मुले आणि मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. बेपत्ता महिलांपैकी 55 ते 60 टक्के महिला पहिल्या वर्षभरात सापडतात, तर अडीच ते तीन वर्षांत हे प्रमाण जवळपास 90 टक्केपर्यंत पोहोचते. सध्या महिलांचा शोध घेण्याच्या प्रमाणात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे, परंतु वर्षभरानंतर मुलींचे कुटुंबीय किंवा वयस्कर व्यक्तींच्या बाबतीत घरचे लोक आणि पोलीस पाठपुरावा करणे सोडून देतात, ही चिंतेची बाब असल्याचे फडणवीस म्हणाले.
आता शोध कामगिरीवर पोलीस ठाण्यांचे रँकिंग ठरवणार
महिला, मुलींच्या शोधमोहिमेला गती देण्यासाठी आता महिलांच्या शोधमोहिमेवर पोलीस आणि पोलीस ठाण्यांचे रँकिंग ठरवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. बेपत्ता मुली, महिलांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आल्याचेही ते म्हणाले.
अशी आहे आकडेवारी
2024 मध्ये 45 हजार 662 महिला तर 11 हजार 316 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. तर 2025मध्ये 48 हजार 278 महिला तर 12 हजार 113 मुली बेपत्ता झाल्या.
हरवलेल्या महिलांचा पोलिसांच्या माध्यमातून शोध घेतला असता 2024 मध्ये 30,877 महिला तर 8475 मुली सापडलया. तर 2025 मध्ये 36,581 तर 10,295 मुली सापडलया आहेत.

























































