
लोकलच्या दिव्यांगाच्या डब्यात घुसून शिताफीने लगतच्या महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलांच्या गळय़ातील सोन्याचे दागिने चोरणाऱया सराईत चोराच्या रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. त्याने केलेल्या पाच गुह्यांची उकल करून पोलिसांनी सात लाख 90 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. कीर्तिमाला वराडकर (60) या वृद्धा त्यांच्या पतीसमवेत लोकलच्या दिव्यांग डब्यातून प्रवास करीत होत्या. त्यावेळी चेहऱयावर रुमाल बांधलेला आणि पायात स्पोर्ट्स शूज घातलेला तरुण डब्यात घुसला. लोकल परळ-करीरोडदरम्यान धिमी होताच त्याने कीर्तिमाला यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले आणि लोकलमधून उडी टाकून पळ काढला. याप्रकरणी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर रेल्वे गुन्हे शाखेने परळ स्थानकात सापळा रचून आरोपीला अटक केली.























































