
30 वर्षांपूर्वी नामांतरण होऊनही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अद्याप उभारण्यात आलेला नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी रेल कामगार सेना शुक्रवारी शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी स्वाक्षरी मोहीम राबवणार आहे. सीएसएमटीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या प्रांगणात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी करीत मुंबईकरांतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
मुंबईतील सर्वाधिक वर्दळीचे आणि प्रमुख रेल्वे स्थानक असलेल्या सीएसएमटी स्थानकाच्या प्रांगणात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलेला नाही. ही खंत समस्त मुंबईकर आणि शिवप्रेमींच्या मनात आहे. देश-विदेशातून येणाऱया लाखो प्रवाशांना शिवरायांच्या कार्याची प्रेरणा मिळावी, या हेतूने सीएसएमटी स्थानक परिसरातील महाव्यवस्थापक इमारतीच्या मुख्य प्रांगणात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी रेल कामगार सेनेने केली आहे. ही मागणी पूर्ण करून घेण्यासाठी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी सीएसएमटी येथील उपनगरी लॉबीसमोर मुंबईकरांची स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. रेल कामगार सेनेच्या वतीने रनिंग स्टाफ प्रमुख प्रशांत कमानकर, सबर्बन प्रमुख अमोघ निमसुडकर, मुंबई मंडल सचिव तुकाराम कोरडे, खजिनदार शैलेश प्रधान आदी पदाधिकाऱयांनी स्वाक्षरी मोहिमेचे नियोजन केले आहे.
शिवसेना नेते, पदाधिकारी मोहिमेत सहभागी होणार
शुक्रवारी सीएसएमटी स्थानकात दरवर्षीप्रमाणे भव्य शिवजन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत शिवसेना नेते, रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, आमदार मिलिंद नार्वेकर, रमेश कोरगावकर, शिवसेना उपनेते दिवाकर (बाबी) देव, रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी आदी नेते-पदाधिकारीही सहभागी होणार आहेत.


























































