
तीन आठवडय़ांपासून प्रतीक्षा लागलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीला अखेर मुहूर्त मिळाला. बुधवारी (दि. 18) रोजी निवडीसाठी विशेष सभा घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले आहेत. या निवडीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून मिरजेचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांची नियुक्ती केली आहे. निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सत्ता स्थापनेसाठी युती, आघाडीतील नेते मंडळींनी जोरदार राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत.
सत्ता स्थापनेत किंगमेकरची भूमिका असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिंदे गटाची भूमिका अद्याप गुलदस्तात आहे. जिल्हा परिषद, पंचायतसमितींच्या निवडणुकीचा निकाल 9 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला; परंतु अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती निवडीचा कार्यक्रम लांबला. त्यामुळे इच्छुक सदस्यांसह नेतेमंडळींमध्ये अस्वस्थता होती. दरम्यान, अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पंचायतसमिती सभापतींची निवड करून पहिली बैठक 20 मार्चपूर्वी घ्या, असे आदेश ग्रामविकास विभागाने 25 रोजी जिल्हाधिकाऱयांना दिले होते. त्यानुसार प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या. पहिल्या टप्प्यात पंचायतसमितीच्या सभापती निवडीसाठी 10 मार्च रोजी सभा बोलविण्याचे आदेश दिले. त्यामुळे सर्वांच्या नजरा मिनी मंत्रालयाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीकडे लागल्या होत्या. जिल्हाधिकारी काकडे यांनी याबाबतचेही आदेश काढले आहेत. निवडीसाठी 18 रोजी सभा बोलवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेत सर्वाधिक 18 जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला मिळाल्या. तसेच भाजप 16, काँग्रेस 11, शिंदे गट 7, राष्ट्रवादीला (अजित पवार गट) 6 तर जनसुराज्य, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणि रयत क्रांतीला प्रत्येकी एक जागा मिळाली. सत्ता स्थापनेसाठी गरजेचे असलेले संख्याबळ महायुतीकडे आहे. मात्र, घटक पक्षांमध्ये मतभेद आहेत. तसेच महाविकास आघाडीला एक जागेची गरज आहे; परंतु सत्ता स्थापनेत कोण कोणाला पाठिंबा देणार याबाबत एकमत झालेले नाही. त्यामुळे सत्तेचा तिढा अद्यापि सुटलेला नाही.
अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. शिंदे गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट)ची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
जिल्हा परिषदेचे पहिले अडीच वर्ष अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. नेत्यांकडूनही चाचपणी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून संध्या आनंदराव पाटील (वाटेगाव गट), संगीता संभाजीराव पाटील (कासेगाव), देविका भोजराज राजेघोरपडे (येलूर), प्रतिमा सुजित मोरे (रेठरेहरणाक्ष), तसेच भाजपकडून स्वप्नाली मनोज मासाळ (डफळापूर गट), माधवी ब्रह्मदेव पडळकर (निंबवडे), कविता किरण पाटील (संख), शिंदे गटाकडून शितल अमोल बाबर (भाळवणी), राष्ट्रवादीकडून (अजित पवार गट) राजेश्वरी रणधीर नाईक (वाकुर्डे बुद्रुक) यांची नावे चर्चेत आहेत.
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम असा
अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी 18 मार्च रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. दुपारी 12 ते 12.30 या वेळेत अर्जांची छाननी होईल. अर्ज मागे घेण्यास दुपारी 12.30 ते 1 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. दुपारी 2 वाजता अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी सभा बोलविण्यात आली आहे.


























































