केडीएमसीच्या आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांना चार महिने पगारच नाही; नर्स, डॉक्टरांनी दिला काम बंद आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण-डोंबिवली महापालिका रुग्णालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या डॉक्टर, नर्स असा जवळपास दोनशे कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून पगारच देण्यात आलेला नाही. याबाबत वारंवार आवाज उठवूनही प्रशासन ढिम्म असल्याने या कर्मचाऱ्यांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आज पालिका मुख्यालयावर धडक देत निषेध आंदोलन केले. पगार नाही तर काम नाही, आश्वासन नको प्रत्यक्ष वेतन हवे असे हातात निषेधाचे फलक घेऊन प्रशासनाचा धिक्कार केला.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचा यापूर्वीही पगार एक-दोन महिने उशिराने होत होता. मात्र आता सलग चार महिने पगार न मिळाल्याने अनेक कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. घरांचे बँक कर्ज हप्ते थकले असून मुलांच्या शाळेची फी, घरातील ज्येष्ठांचे औषधोपचार आणि दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले आहे. प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळतात. मात्र प्रत्यक्ष कार्यवाही होत नाही असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.

आंदोलनामुळे सुरक्षा यंत्रणेची धावपळ

वसई-विरार, उल्हासनगर, ठाणे महापालिकांमध्ये अभियानातील कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी आणि महागाई भत्ता मिळतो. मग कल्याण-डोंबिवलीत अडचण काय? असा संतप्त सवाल कर्मचाऱ्यांनी केला. दरम्यान, अचानक केलेल्या आंदोलनामुळे सुरक्षा यंत्रणेची धावपळ उडाली. रखडलेला वेतनाचा प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

  • अभियान विभागाकडून पालिकेला वेतनासाठी निधी प्राप्त झाला आहे. मग वेतन देण्यास का टाळाटाळ केली जात आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
  • कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांची भेट घेऊन निवेदन दिले. मात्र पगार कधी होणार याबाबत स्पष्ट माहिती मिळाली नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.