युद्धाचा परिणाम, साठा संपल्याची अफवा… पेट्रोलपंपांवर लांबच लांब रांगा, ‘नो स्टॉक’चे झळकले बोर्ड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण युद्ध पेटल्यामुळे देशात येणाऱ्या कच्च्या मालाची आयात पूर्णपणे थांबली आहे. युद्धाचा काहीसा परिणाम जाणवत असलातरी शहरात सुटीमुळे डिझेल-पेट्रोलचे टँकर आले नाहीत. पर्यायाने टंचाई निर्माण झाल्याची अफवा पसरताच पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे एकच गर्दी झाली. पेट्रोल-डीलर असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी मात्र नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी गदीं करू नये, असे आवाहन केले.

सध्या अमेरिका-इस्त्रायलविरुद्ध इराण युद्धाचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. युद्ध सुरू होऊन चार दिवस उलटले तरी थांबायला तयार नाही. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असून लाखो पर्यटक, नागरिक आखाती देशात अडकले आहेत. देशातून बाहेरच्या देशांत आणि बाहेरच्या देशातून भारतात होणारी आयात-निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे. मालाची आवक घटल्यामुळे या युद्धाचा काहीसा परिणाम जाणवू लागला आहे. त्यातच रविवार, त्यापाठोपाठ होळी-धुळवड सणाची सुटी आल्यामुळे मनमाड-पानेवाडी डेपोतून पेट्रोल-डिझेल घेऊन टँकर उशिराने निघाले. परंतु, शहरात एकच अफवा पसरली.

पेट्रोल-डिझेल मिळणार नसल्याने टंचाई निर्माण झाली. या अफवेमुळे वाहनधारकांचे धाबे दणाणले. काही वेळातच शहरातील पेट्रोलपंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी प्रचंड गर्दी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मंगळवारी धुळवड साजरी करताना पेट्रोलपंपावर वाहने घेऊन नागरिक दाखल झाले. अचानक गर्दी वाढल्याचे पाहून पेट्रोलपंप चालकही गोंधळून गेले. पेट्रोल भरून घेण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक पेट्रोल-डिझेलपंप कोरडेठाक झाले. वाहनधारकांची पेट्रोल भरून घेण्यासाठी धावपळ सुरू होती.

पेट्रोलच्या शोधासाठी धावपळ

शहरात ४८ पेट्रोलपंप असून त्यापैकी ३८ पेट्रोलपंपांवर नो-स्टॉकचे फलक झळकले. दहा पेट्रोलपंपांवर दुपारपर्यंत असलेला पेट्रोलचा साठाही संपला. त्यामुळे वाहनधारकांमध्ये एकच खळबळ उडाली. पेट्रोल-डिझेलचा साठा करून घेण्यासाठी वाहनधारकांची धावपळ सुरू होती.

अफवांवर विश्वास ठेवू नका – अखिल अब्बास

या संदर्भात शहरातील पेट्रोल-डिझेल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांना विचारले असता ते म्हणाले की, शहरात पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झाल्याची अफवा पसरली. त्यामुळे पेट्रोलपंपावर एकच गर्दी उसळली. पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सुटीमुळे मनमाड-पानेवाडी डेपोतून टँकर येण्यास उशीर झाला असून कुठेही पेट्रोल-डिझेलची टंचाई नाही. नागरिकांनी विनाकारण पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन अखिल अब्बास यांनी केले.