
पुणे शहरातील रस्त्यांवर कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्या आणि ‘फटाका’ सायलेन्सरद्वारे ध्वनिप्रदूषण करणाऱ्या बुलेटचालकांना पुणे शहर वाहतूक पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. गेल्या काही दिवसांत राबविलेल्या विशेष मोहिमेत २८२२ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, जप्त केलेल्या ९०० मॉडिफाय सायलेन्सरवर पोलिसांनी थेट बुलडोझर फिरवून ते निकामी केले आहेत.
अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव उपस्थित होते. शहर परिसरात, विशेषतः तरुणवर्गामध्ये बुलेटच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून जोरात आवाज काढण्याचे फॅड वाढले आहे. यामुळे रुग्णालय, शाळा आणि महाविद्यालयीन परिसरांत ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या तक्रारींची दखल घेऊन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी शहरात व्यापक मोहीम हाती घेतली.
आवाज करायचा नाय… ध्वनी प्रदूषण करणाऱ्या 800 हून अधिक बुलेट सायलेन्सवर पुणे वाहतूक पोलिसांचा बुलडोझर pic.twitter.com/q18LpXIp1i
— Saamana Online (@SaamanaOnline) March 5, 2026
या मोहिमेत एकूण २८२२ वाहने दोषी आढळली असून, त्यांपैकी ९०० मॉडिफाय सायलेन्सर पोलिसांनी घटनास्थळीच जप्त केले. या धडक कारवाईतून आतापर्यंत २८ लाख १७हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरातील हडपसर, कोरेगाव पार्क, विमानतळ, डेक्कन, भारती विद्यापीठ यांसह प्रमुख भागांत हे प्रकार मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. पहिल्या गुन्ह्यासाठी एक हजार, तर दुसऱ्या गुन्ह्यासाठी दोन हजार रुपये दंड आकारला जात आहे.
वाहनधारकांना मॉडिफाय सायलेन्सर बदलून देणाऱ्या गॅरेजचालकांवरदेखील कारवाई केली जाणार आहे. अशा गॅरेजचालकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त
जप्त केलेले सायलेन्सर पुन्हा वापरात येऊ नयेत यासाठी येरवडा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात त्यावर बुलडोझर चालवून त्यांचे तुकडे केले. यापुढेही ही मोहीम सुरू राहणार असून, बेशिस्त चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.




























































