
गोरगरीब-दुर्बल घटकांना रास्त दरात रुग्णसेवा देण्याच्या नावाखाली सुरू करण्यात आलेल्या राज्यातील शुश्रूषागृहांकडूनच गोरगरीबांना लुटण्याचे प्रकार सुरू आहेत. खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबतची माहिती लेखी उत्तरात दिली आहे. यानुसार अवाजवी पैसे आकारणाऱ्या राज्यातील तब्बल 4 हजार 538 खासगी शुश्रूषागृहांना नोटीस बजावण्यात आली असून सहा शुश्रूषागृहांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
राज्यातील खासगी शुश्रूषागृहांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 2021मध्ये खास नियमावली तयार करण्यात आली. यानुसार शुश्रूषागृहांना रुग्णसेवेची सनद, दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले. मात्र याकडे बहुतांशी शुश्रूषागृहांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत आरोग्य विभाग कोणती कार्यवाही करीत आहे याबाबत आमदार श्रीकांत भारतीय यांनी प्रश्न विचारला होता. याला आरोग्यमंत्री आबिटकर यांनी विधान परिषदेत लेखी उत्तर दिले. दरम्यान, आरोग्य विभागाच्या माहितीनुसार अवाजवी दर आकारणे, आवश्यक सुविधा न ठेवणे, परवाना अटींचे उल्लंघन करणे अशा कारणांमुळे ही कारवाई केली आहे.
एका महिन्यात त्रुटी दूर करा
राज्यातील एकूण 23 हजार 454 खासगी रुग्णालयांची तपासणी स्थानिक प्राधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली. यात 4,538 खासगी रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळून आल्याने नोटीस बजावली होती. नोटीस मिळालेल्या रुग्णालयांना त्रुटी दूर करण्यासाठी 1 महिन्याची मुदत दिली आहे. या कालावधीत आवश्यक सुधारणा न केल्यास संबंधित रुग्णालयांवर पुढील प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.



























































