अमेरिकेचे तेलवाहू जहाज उडवले, आयरिस देना या युद्धनौकेवरील हल्ल्याचा बदला इराणने अवघ्या 24 तासांत घेतला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाचे सर्वोच्च नेतृत्व गमावल्यानंतरही इराणने अमेरिका आणि इस्रायलला फेस आणला आहे. इराणच्या प्रत्येक हल्ल्याला तोडीस तोड उत्तर दिले जात आहे. हिंद महासागरात अमेरिकेने ‘आयरिस देना’ या युद्धनौकेवर केलेल्या हल्ल्यास 24 तास होत नाहीत तोच इराणने आज बदला घेतला. इराणने पर्शियाच्या आखातात अमेरिकेचे तेलवाहू जहाज उडवून दिले. इतकेच नव्हे, इराणने इस्रायलमधील अणुप्रकल्पावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे अवघे जग धास्तावले आहे.

हिंदुस्थानने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय नौदल सरावात सहभागी होऊन परतणारी इराणी युद्धनौका अमेरिकेने गुरुवारी पाणबुडीतून हल्ला करून बुडवली. त्यात 87 जणांचा मृत्यू झाला, तर 67 सैनिक बेपत्ता आहेत. अमेरिकेला या हल्ल्याचा पश्चात्ताप करावा लागेल, अशी धमकी इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने दिली होती. ती धमकी इराणने खरी करून दाखवली. अमेरिकेचे तेलवाहू जहाज इराणने उडवले. हे जहाज जळून खाक झाल्याचा दावा इराणने हल्ल्यानंतर केला.

इराणमध्ये सत्ता उलथवण्याचा खटाटोप अमेरिका-इस्रायलने सुरूच ठेवल्यास इस्रायलचा दिमोना येथील सर्वात गुप्त अणुप्रकल्प मिसाईलने उडवून देण्याची धमकी इराणने दिली आहे. इस्रायलच्या दक्षिण भागातील दिमोना शहराजवळ शिमोन पेरेस नेगेव अणु संशोधन केंद्र आहे. हे संशोधन पेंद्र असल्याचे सांगितले जात असले तरी हा प्रकल्प इस्रायलच्या छुप्या अण्वस्त्र कार्यक्रमाचाच भाग मानला जातो. हा अणुप्रकल्प इस्रायलमधील अतिसंरक्षित स्थळांपैकी एक आहे. हवाई संरक्षण यंत्रणेचे अनेक स्तरीय संरक्षण या प्रकल्पाला देण्यात आले आहे. या अणुप्रकल्पावर हल्ला झाल्यास आणि तो यशस्वी झाल्यास केवळ इस्रायलच नव्हे तर जॉर्डनसारख्या शेजारी राष्ट्रांवरही मोठे संकट ओढवू शकते.

हिंदुस्थानकडून खामेनींच्या मृत्यूवर सहा दिवसांनी शोक

अमेरिका-इस्रायलने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या केल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी निषेध व शोक व्यक्त केला. मोदी सरकार मात्र यावर मौन बाळगून होते. चौफेर टीकेनंतर अखेर सरकारला आज सहा दिवसांनी जाग आली. हिंदुस्थानचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिल्लीतील इराणी दूतावासाला भेट देऊन खामेनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांना फोन

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज दुपारी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्याशी फोनवर संपर्क साधून सद्यस्थितीवर चर्चा केली. जयशंकर यांनी ओमानचे परराष्ट्रमंत्री सय्यद बद्र बिन हमद अल-बुसैदी यांच्याशीही फोनवर चर्चा केली.

हिंदुस्थानी नौदल ‘आयरिस देना’च्या मदतीला

अमेरिकेच्या हल्ल्यात बुडालेल्या इराणच्या ‘आयरिस देना’ या युद्धनौकेच्या आपत्कालीन कॉलला हिंदुस्थानी नौदलानेही प्रतिसाद दिला होता. बुडालेल्या नौकेचा शोध घेण्यासाठी हिंदुस्थानी नौदलाने सागरी गस्त सुरू केली होती. नौदलाच्या जहाजासह विमाने मदत व बचावकार्यात उतरवली होती.

20 हजार खलाशी, 15 हजार प्रवासी अडकले!

संयुक्त राष्ट्रांच्या मेरिटाइम संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, आखाती देशात पेटलेल्या युद्धामुळे तब्बल 20 हजार खलाशी आणि 15 हजार प्रवासी समुद्रातच अडकून पडले आहेत. या सर्वांची सुखरूप सुटका करण्यासाठी मेरिटाइम संघटना प्रयत्नशील असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.

इराणमध्ये 1230 लोक ठार

अमेरिका व इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणमध्ये आतापर्यंत 1230 लोक मारले गेले आहेत. इराण सरकारच्या संस्थेने ही माहिती दिली आहे.

युद्धाला विरोध, अमेरिकी सिनेटमध्ये राडा

इस्रायलच्या साथीने अमेरिकेने इराण विरुद्ध सुरू केलेल्या युद्धाला अमेरिकेतच विरोध होत आहे. या मुद्दय़ावरून आज सिनेटमध्ये राडा झाला. सिनेटच्या सशस्त्र सेवा समितीच्या बैठकीदरम्यान एका माजी सैनिकाने युद्धाविरोधात घोषणाबाजी सुरू केली. ‘इराण विरुद्धच्या युद्धाला इस्रायल जबाबदार आहे. अमेरिकी सैनिकांना इस्रायलसाठी लढण्याची इच्छा नाही. कोणालाही आपल्या मुला-मुलींना इस्रायलसाठी लढाईत उतरवायचे नाही, असे सांगत या सैनिकाने सिनेटमधील सुनावणी बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी आणि रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांनी त्याला धक्काबुक्की करून सभागृहाबाहेर काढले. या झटापटीत त्याचा हात फ्रॅक्चर झाला.