
>>मंगेश वरवडेकर
वानखेडे स्टेडियमवर आज क्रिकेटचा आवाज घुमला, पण स्फोट झाला तो धावांचा आणि षटकारांचा. श्वास रोखायला लावणाऱ्या थरारक उपांत्य फेरीच्या या रनसंग्रामात संजू सॅमसनने रचलले एव्हरेस्ट सर करून देण्यासाठी जेकब बेथेलने दिलेली शतकी झुंज थोडक्यात अपुरी ठरली आणि हिंदुस्थानने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव करत टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. आता जगज्जेतेपद राखण्यासाठी हिंदुस्थानला रविवारी न्यूझीलंडशी अंतिम झुंज करावी लागणार आहे.
हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामन्यात जो जिंकतो तोच जगज्जेता ठरतो, हे गेल्या दोन्ही वेळेला खरे ठरले होते. आता सलग तिसऱ्यांदा दोन्ही संघ उपांत्य फेरीत एकमेकांना भिडले आणि या संघर्षात हिंदुस्थानने बाजी मारली. आता हा योगायोग हॅटट्रिक मारतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वानखेडेवर झालेल्या धावास्फोटात 499 धावांसह 34 षटकारांचा वर्षाव झाला.
संजू सॅमसनच्या त्सुनामीमुळे हिंदुस्थानने 253 धावांचा एव्हरेस्ट उभारल्यानंतर इंग्लिश संघाची 4 बाद 95 अशी स्थिती झाली आणि हिंदुस्थानने अहमदाबाद गाठले, अशी प्रत्येकाची भावना झाली होती. मात्र जेकब बेथेल आणि विल जॅक्सने पाचव्या विकेटसाठी 77 धावांच्या भागीने सामन्याचा थरार वाढवला. बेथेलच्या बॅटमधून सुटणारे रॉकेट शॉट्स पाहून हिंदुस्थानींची धाकधूक वाढली होती. त्याने 45 चेंडूंत शतक ठोकत सामना इंग्लंडही जिंकू शकतो, हे दाखवले. मात्र 6 चेंडूंत 30 धावांची गरज असताना बेथेल दुहेरी धाव चोरताना धावबाद झाला आणि हिंदुस्थानने सुटकेचा निःश्वास सोडला. यानंतर जोफ्रा आर्चरने 4 चेंडूंत 19 धावा फटकावत इंग्लंडला 246 धावांपर्यंत नेले आणि 254 धावांचे एव्हरेस्ट सर करायला इंग्लंडला 8 धावा कमी पडल्या.
त्याआधी हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलचा थरार रंगला आणि या थराराचा पहिला अंक संजू सॅमसनच्या त्सुनामीने गाजला. अभिषेकच्या निराशेच्या खेळीनंतर संजूने इशान किशनसह दुसऱ्या विकेटसाठी 45 चेंडूंत 97 धावांची सुस्साट भागी रचत हिंदुस्थानच्या अडीच शतकी डोंगराचा पाया रचला. इशान 39 धावांवर बाद झाला. त्यानंतर संजूने आपली फटकेबाजी कायम ठेवली. तो बाद झाल्यावर शिवम दुबे (43), हार्दिक पंडय़ा (27), आणि तिलक वर्माच्या (21) ठोकाठोकीने हिंदुस्थानला अपेक्षित अडीचशे धावांचा टप्पा गाठून दिला. 10 षटकांत 119 धावा करणाऱ्या हिंदुस्थानने नंतरच्या 10 षटकांत 134 धावा फटकावल्या.
चौकारांपेक्षा षटकारांचा वर्षाव
आज हिंदुस्थानी फलंदाजांच्या षटकारबाजीने नवा पराक्रम केला. संजू, तिलक, हार्दिक आणि शिवमच्या उत्तुंग फटक्यांनी हिंदुस्थानच्या खात्यात चक्क 19 षटकारांची भर घातली. विशेष म्हणजे या डावात 18 चौकार लावले गेले. एका डावात चौकारापेक्षा षटकारांची संख्या जास्त असल्याचा पराक्रम यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये यंदा घडला.
हिंदुस्थानचे एक, तर इंग्लंडची दोन अर्धशतके
हिंदुस्थानने 253 धावांचा पाऊस पाडला असला तरी पूर्ण डावात केवळ संजू सॅमसन यालाच अर्धशतक ठोकता आले. मात्र इंग्लंडच्या दोन गोलंदाजांना अर्धशतकी फटका बसला. म्हणजे जोफ्रा आर्चर आणि सॅम करण या गोलंदाजांना 50 पेक्षा अधिक धावा चोपून काढल्या. आर्चरला 61 धावा चोपल्या तर करणने 53 धावा मोजल्या.
वानखेडेवर सॅमधूम
इडन गार्डन्स गाजवल्यानंतर वानखेडेवरही सॅमसनची धूम होती. जोफ्रा आर्चरला चौकार आणि षटकार खेचून आपल्या डावाची सुरुवात करणाऱ्या संजूने आपले मनसुबे स्पष्ट केले, पण त्याला आर्चरच्या दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर 15 धावांवर असताना लाभलेल्या जीवदानाने सामन्याचा सारा नूरच पालटवला. कर्णधार हॅरी ब्रूकच्या हातून सुटलेल्या या झेलाने त्याच क्षणी सामना नव्हे वर्ल्ड कप गमावल्याचे भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटले होते. या जीवदानानंतर संजू अधिक घातक झाला आणि त्याने वानखेडेवर षटकारांचे रॉकेट खेचत नवव्या षटकात शतक आणि 13 व्या षटकात दीडशतक गाठून दिले. त्याची षटकारबाजी पाहता तो इडनवर हुकलेले शतक वानखेडेवर ठोकणार, असे वाटत असतानाच त्याचा झंझावात 89 धावांवर शांत झाला.





























































