बिहारमध्ये नितीशराज संपुष्टात; नितीश कुमार यांनी भरला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांच्या कार्यकाळाचा हा अस्त मानला जात असून त्यांच्या राज्यसभेवर जाण्याच्या निर्णयाला पक्षातूनच विरोध होत आहे. नितीश कुमार यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली. संतप्त कार्यकर्त्यांनी जदयूच्या कार्यालयात तोडपह्ड केली तर, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणारे काही मंत्री आणि आमदारांना कार्यकर्त्यांनी पिटाळून लावले. दुसरीकडे, नितीशकुमार राज्यसभेवर गेल्यानंतर बिहारचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचा होणार असल्याचे चित्र आहे. मात्र, त्याचवेळी जदयूने गृह खात्यावर दावा केला आहे. सध्या हे खाते भाजपकडे आहे.

नितीश कुमार यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून आपण राज्यसभेवर जात असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आज सकाळपासून कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली. नितीश कुमार बिहारचे आहेत, त्यांना कुठेही जाऊ देणार नाही, असे म्हणत अनेक कायकर्ते भावूक झाले. त्याचवेळी काही ठिकाणी कार्यकर्ते प्रचंड नाराज झालेले देखील पाहायला मिळाले. बेगूसराय, नालंदासह अनेक जिह्यांमध्ये कार्यकर्त्यांनी नितीश कुमार यांच्या राज्यसभेत जाण्यास विरोध केला आहे. भाजपच्या कोटय़ातील मंत्री सुरेंद्र मेहता, जदयूचे आमदार संजय गांधी आणि प्रेम मुखिया यांना कार्यकर्त्यांनी पिटाळून लावले.

मुख्यमंत्रीपदासाठी कोणाची नावे चर्चेत?
पुढचा मुख्यमंत्री भाजपचा राहणार, हे जवळपास निश्चित आहे. तसे झाल्यास प्रथमच बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री असेल. त्यासाठी विद्यमान उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचे नाव आघाडीवर आहे. ते कुशवाहा समाजातून येतात. त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री नित्यानंद राय, माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप जायस्वाल तसेच पाच वेळचे आमदार संजीव चौरासिया यांची नावे चर्चेत आहेत.

भाजपने नितीश यांना केले हायजॅक
– तेजस्वी यादव
बिहारमध्ये महाराष्ट्राचे मॉडेल भाजपने लागू केले आहे. नितीश कुमार यांना एवढे छळले, की त्यांना राजीनामा द्यावा लागत आहे. भाजप आपल्या सहयोगी पक्षांना संपवते, भाजपने नितीश यांना हायजॅक केले आहे, अशी टीका राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केली आहे.