ट्रम्प यांना पुन्हा झटका, टॅरिफचे 16 लाख कोटी परत करा; न्यायालयाचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणविरोधात युद्ध सुरू करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांनी जगभरावर लादलेले मनमानी टॅरिफ रद्द केल्यानंतर आता ट्रम्प प्रशासनाला टॅरिफपोटी वसूल केलेली रक्कम परत करावीच लागेल, असा निर्णय न्यूयॉर्क येथील न्यायालयाने दिला आहे. सर्व आयातदार या परताव्यासाठी पात्र आहेत, असे न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाच्या निर्णयानंतर ट्रम्प प्रशासनाला तब्बल 175 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 16 लाख कोटी रुपये एवढी रक्कम कंपन्यांना परत करावी लागेल.

गेल्या वर्षी ट्रम्प यांनी हिंदुस्थान, चीन, मेक्सिको, कॅनडा तसेच युरोपमधील देशांवर टॅरिफ लादले होते. त्यानंतर अनेक कंपन्यांनी टॅरिफचे शुल्क परत मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.

निकालाला ट्रम्प प्रशासन देऊ शकते आव्हान देऊ
सर्वोच्च न्यायालयाने 20 फेब्रुवारी रोजी टॅरिफ रद्द ठरवण्याबाबत दिलेल्या निर्णयात परताव्याबाबत स्पष्टता नव्हती. आता न्या. ईटन यांनी निकाल दिल्यामुळे चित्र स्पष्ट झाले आहे. न्या. ईटन यांनी दिलेल्या निकालाविरोधात ट्रम्प प्रशासन वरच्या न्यायालयात आव्हान देऊ शकतात किंवा मुदत मागू शकतात.