
कोपरखैरणे येथील एका सोसायटीच्या तळमजल्यावर असलेल्या कोचिंग क्लासचा स्लॅब आज संध्याकाळी कोसळला. या दुर्घटनेत सातवीत शिकणाऱ्या 13 वर्षीय मनीष म्हसे या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून काही मुले जखमी झाली आहेत. या घटनेमुळे कोचिंग क्लासमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कोपरखैरणे येथे विद्या भवन ही 28 वर्षे जुनी तळ अधिक चार मजल्याची इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर खासगी कोचिंग क्लास सुरू होता. त्यावेळी सिद्धांत गुप्ता, प्रिन्स सोनी, आयशा खान, कुलसुम खान, निष्का धनावडे, मनीष म्हसे, आराध्या बोरसे, तन्वी श्रीवास्तव, देवांश पुजारी, राजदीप वानखेडे, पार्थ खैरनार, रुद्र पाटील हे विद्यार्थी व शामली चौधरी या शिक्षिका होत्या.
क्लास सुरू असताना संध्याकाळी पाचच्या सुमारास अचानक मोठा आवाज आला आणि पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला. त्यात मनीष म्हसे (सातवी) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. जीवाच्या आंकाताने अन्य विद्यार्थी बाहेर पडण्यासाठी धडपड करत होते. या दुर्घटनेत जखमी झालेल्या घटनेची चौकशी सुरू
काही मुलांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन या मुलांना सुखरूप इमारतीबाहेर काढले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. विद्या भवन या इमारतीमध्ये आठ ते दहा कुटुंबे राहात होती. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटना स्थळी भेट देऊन घटनेची चौकशी सुरू केली आहे.




























































