Iran Israel war – इराणनंतर आता अमेरिकेच्या रडारवर आणखी एक देश; डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
donald trump claims saving 35 million lives in india pakistan operation sindoor | saamana

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात एका नव्या वादाला तोंड फुटेल असे खळबळजनक विधान केले आहे. व्हाईट हाऊसमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान बोलताना ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, सध्या अमेरिकेचे संपूर्ण लक्ष इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षावर केंद्रित आहे, मात्र हा प्रश्न सुटल्यानंतर अमेरिकेचे पुढील लक्ष्य क्युबा असेल. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात क्युबाबाबत मोठ्या हालचाली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून जागतिक स्तरावर याचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

प्रशासकीय कामकाजाचा संदर्भ देताना ट्रम्प म्हणाले की, सध्या इराणसोबतची परिस्थिती हाताळणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. हे युद्ध किंवा हा तणाव एकदाचा संपला की क्युबाबाबत स्वतंत्र आणि ठोस पावले उचलली जातील. विशेष म्हणजे, क्युबन सरकार अमेरिकेशी करार करण्यासाठी उत्सुक असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. या विधानादरम्यान ट्रम्प यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याकडे पाहत सूचक टिप्पणी केली. क्युबन वंशाचे असलेल्या रुबियो यांना उद्देशून ट्रम्प म्हणाले की, “तुम्ही क्युबावर उत्तम काम करत आहात,” ज्यामुळे क्युबाबाबत पडद्यामागे काही विशेष हालचाली सुरू असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही ट्रम्प यांनी क्युबावर ‘मैत्रीपूर्ण ताबा’ मिळवण्याबाबत सूचक विधान केले होते. जरी त्यांनी या ‘मैत्रीपूर्ण ताब्याचा’ नेमका अर्थ स्पष्ट केला नसला, तरी त्यांच्या ताज्या विधानामुळे अमेरिका-क्युबा संबंधांमध्ये भविष्यात कठोर रणनीती अवलंबली जाण्याचे संकेत मिळत आहेत. अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते, ट्रम्प यांचे हे विधान म्हणजे क्युबावरील दबाव वाढवण्याच्या मोठ्या योजनेचा एक भाग असू शकतो. दुसरीकडे, क्युबा सध्या इतिहासातील अत्यंत गंभीर आर्थिक आणि ऊर्जा संकटाचा सामना करत आहे. इंधनाच्या तीव्र टंचाईमुळे क्युबामध्ये वीजपुरवठा दीर्घकाळासाठी खंडित होत असून अनेक भागात 15 ते 20 तास अंधार असतो. या परिस्थितीचा मोठा फटका तिथल्या रुग्णालये आणि शाळांना बसला आहे. अमेरिकेने तेल पुरवठ्यावर लादलेल्या दबावामुळे क्युबाची ही आर्थिक कोंडी अधिकच बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत ट्रम्प यांनी केलेले विधान क्युबाच्या अडचणीत अधिक भर घालणारे ठरू शकते.